नवोदित गायकांच्या प्रतिभेला फुटू लागले अंकुर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

पिंपरी-चिंचवड आयडॉल स्पर्धेमुळे मिळतेय प्रोत्साहन; रसिकांचीही दाद

पिंपरी - कोणत्याही कलेला व्यासपीठ आणि राजाश्रय मिळणे आवश्‍यक असते. तसेच कलाकारांच्या प्रतिभेला रसिकांची दाद महत्त्वाची असते. शहरात सलग चार वर्षांपासून सुरू असलेल्या पिंपरी-चिंचवड आयडॉल स्पर्धेतून एकीकडे गायक कलाकारांची जडणघडण होत आहे, तर दुसरीकडे रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळत असल्याने त्यांच्या प्रतिभेला नवे अंकुर फुटू लागले आहेत.

स्पर्धेचे यंदा चौथे वर्ष आहे. पहिली आयडॉल होण्याचा मान शाहूनगर येथील नूपुरा निफाडकर हिला मिळाला होता. ती सध्या संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासमवेत चेन्नई येथील इन्स्टिट्यूटमध्ये काम करीत आहे. चिंचवड येथील कौस्तुभ दिवेकर हा दुसऱ्या वर्षी ‘आयडॉल’ ठरला. सध्या तो तीन ते चार चित्रपटांमध्ये पार्श्‍वगायन करीत आहे. निगडी-प्राधिकरण येथील तेजश्री देशपांडे ही तिसरी आयडॉल होती. आषाढी एकादशीच्या निमित्ताने नुकताच तिचा ‘विठ्ठल बरसला’ हा व्हिडिओ अल्बम आला, अशी माहिती स्पर्धेचे 
संगीत संयोजक मधुसूदन ओझा यांनी दिली. 

अंतिम फेरी ३ ऑगस्टला
स्पर्धेच्या (मोरया करंडक) पहिल्या फेरीत १५१ गायकांनी भाग घेतला. त्यातील ५८ जणांना दुसऱ्या फेरीत संधी मिळाली. चिंचवड येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (पिंपरी-चिंचवड) कार्यालयात ही फेरी सुरू आहे. १५ ते ३५ वयोगटांतील गायकांना त्यामध्ये संधी दिली आहे. मानसी भोईर आणि सुषमा बोऱ्हाडे त्याचे संयोजन करीत आहेत. स्पर्धेची उपांत्य फेरी २५ जुलैला तर, अंतिम फेरी ३ ऑगस्टला चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत होणार आहे.

स्पर्धेतून नवोदित गायकांना व्यासपीठ मिळत आहे. त्यांची वेगळी ओळख तयार होत आहे. यापूर्वी सहभागी झालेल्या सुमारे ५० गायकांना व्यावसायिक कार्यक्रम मिळाले आहेत. त्यामुळे त्यांना उदरनिर्वाहाचे साधन सापडले आहे. 
- भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष, मध्यवर्ती शाखा, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

स्पर्धेत ठुमरी, कव्वाली, भावगीत, भक्तिगीत, अभंग, लोकगीत, लावणी अशी गाणी सादर करण्याची संधी गायकांना दिली जाते. गायकाचा बाज पाहून त्याला विषयानुरूप गाणी दिली जातात. 
- मधुसूदन ओझा, संगीत संयोजक