पोलिसांच्या पत्नींना आरोग्य अन्‌ उद्योजकतेचे धडे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

नाशिक - पोलिस कर्मचाऱ्यांच्या पत्नींनीही कोणताही न्यूनगंड न बाळगता स्वत:च्या क्षमता ओळखून घरगुती उद्योगातून स्वत:चे स्थान निर्माण करावे, तसेच स्वत:च्या आरोग्याची महिलांनी निगा राखली पाहिजे, या उद्देशाने पोलिस आयुक्तालयातर्फे पोलिस कर्मचाऱ्यांच्या सौभाग्यवतींसाठी खास उपक्रम झाला. 

त्र्यंबकेश्‍वर रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीतील शताब्दी सभागृहात आज सकाळी पोलिस कर्मचाऱ्यांच्या सौभाग्यवतींसाठी "स्वतःला ओळखा आणि उद्योजगता विकसित करा' आणि "महिलांचे आरोग्य व आहार' या विषयांवर व्याख्यान झाले. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, उपायुक्त विजय पाटील, श्रीकांत धिवरे प्रमुख पाहुणे होते. 

"स्वतःला ओळखा आणि उद्योजगता विकसित करा' या विषयावर नेहा खरे यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ""घरबसल्या महिला विविध उद्योग करू शकतात. अनेक महिलांनी छोट्या-छोट्या व्यवसायातून सुरवात करून आज मोठे उद्योगसमूह उभे केले आहेत.'' या वेळी त्यांनी घरगुती उद्योगांसंदर्भात सविस्तर माहिती दिली. 

त्यानंतर डॉ. भाग्यश्री आहेर यांनी "महिला आरोग्य आणि आहार' या विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ""पूर्ण कुटुंबाची काळजी घेणाऱ्या महिला स्वत:च्या शरीराची काळजी घेत नाहीत. घरकाम, मुलांची शाळा, घरगुती जबाबदाऱ्यांमुळे स्वत:च्या दुखण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे असाध्य आजार जडण्याची शक्‍यता बळावते. महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. त्यासाठी आपल्या सुखी कुटुंबासाठी महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.'' 

व्याख्यानानंतर उपस्थित महिलांना महाराष्ट्र पोलिस प्रशिक्षण अकादमीची सैरही घडविण्यात आली. प्रशिक्षण स्थळ, वस्तुसंग्रहालय दाखविण्यात आले. पोलिस मुख्यालय वसाहत, पोलिस मुख्यालय नाशिक रोड, पाथर्डी फाटा, देवळाली कॅम्प येथून महिलांसाठी विशेष बसची व्यवस्था करण्यात आली होती. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुमारे 160 महिला उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.