चित्रांमधले दीप उजळती प्रत्यक्षात 

नीला शर्मा 
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

पुणे - इतिहास जपणाऱ्या त्या चित्रांमधून वर्तमानातील प्रकाशकिरणे बाहेर पडताच दोन काळांचा अपूर्व संगम अनुभवायला मिळतो. उत्तर पेशवाईतील थोर मुत्सद्दी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाना फडणवीसांच्या व्यक्तिगत संग्रहातील ती दोन चित्रे पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. 

पुणे - इतिहास जपणाऱ्या त्या चित्रांमधून वर्तमानातील प्रकाशकिरणे बाहेर पडताच दोन काळांचा अपूर्व संगम अनुभवायला मिळतो. उत्तर पेशवाईतील थोर मुत्सद्दी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाना फडणवीसांच्या व्यक्तिगत संग्रहातील ती दोन चित्रे पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. 

काशीनगरीतून वाहणाऱ्या गंगेच्या घाटांचे सायंकालीन वातावरण त्या चित्रांमध्ये हुबेहूब साकारलेले आहे. विशेष म्हणजे घाटावर आणि परिसरातील इमारतींमध्ये लावलेल्या पणत्यांचा प्रकाश रंगांमधून दाखविलेला नाही. प्रत्यक्ष प्रकाश अनुभवण्याची योजना केलेली आहे. ज्योतींच्या जागी छिद्रे आहेत. अंधार करून चित्रांमागे पूर्वी समई लावून ठेवत असत. आता आधुनिक काळानुरूप बल्ब लावला जातो. त्याचा प्रकाश चित्रांमधील छिद्रांतून प्रकटताच पणत्या तेवत असल्याचा अद्भुत प्रत्यय येतो. ही अनोखी चित्रे पुण्यातील सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेच्या संग्रहालयातील अमूल्य ठेवा आहेत. 

संस्थेचे सचिव श्री. मा. भावे यांनी सांगितले, की इ. स. 1783 ते 85 दरम्यान ही चित्रे काढलेली असावीत. नाना फडणवीसांना काशीला जाऊन राहण्याची तीव्र इच्छा होती. ती प्रत्यक्षात न आल्यामुळे त्यांनी कोणा चित्रकाराकडून तेथील दृश्‍य चित्रबद्ध करवून आपली इच्छा पूर्ण करून घेतली. त्या काळी कदाचित दाभण किंवा बाभळीच्या काट्याने चित्रातील पणत्यांच्या जागी छिद्रे केली असावीत. 

संग्रहालय व्यवस्थापनाकडून परवानगी घेऊन ही चित्रे पाहायला मिळू शकतात. भावे म्हणाले, ""मेणवलीला नाना फडणवीसांच्या वाड्यात ही चित्रे होती. त्यांच्या वंशजांनी 1920 मध्ये काही दस्तऐवज, ही चित्रे आणि एक अंगरखा आमच्या संस्थेकडे सोपविला. "ही चित्रे केवळ कलाप्रेमीच नव्हे, तर इतिहासाचे अभ्यासक, पर्यटक व शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या कुतूहलाचा विषय ठरतात. काशीमध्ये निरनिराळ्या घाटांवरून अनेक जण दररोज सायंकाळी गंगेच्या प्रवाहात पणत्या प्रवाहित करतात. तेथे रोजच दिवाळी असल्यासारखे भासते. ही चित्रे काढली गेली तो ऐतिहासिक काळ आजच्या प्रकाशकिरणांमध्ये नव्याने उजळताना पाहण्याचा आनंद प्रत्येकाने एकदा तरी लुटायला हवा.''