डीएसके विश्‍व येथील रस्त्याची श्रमदानातून दुरुस्ती 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

धायरी -  रस्तादुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही कार्यवाही होत नाही. त्यानंतर नागरिक स्वत:च या कामासाठी पुढे येतात आणि श्रमदानातून हे मोठे काम सुरू होते. त्यानंतर या कामाची दखल प्रशासनालादेखील घ्यावी लागली आणि अखेर हे काम पूर्णत्वास गेले. धायरीतील डीएसके विश्‍व येथे ही सुखद घटना घडली. 

डीएसके विश्‍व येथील रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे अनेक वेळा अपघातही झाले होते; तसेच खड्ड्यांचा त्रास सर्वांना सहन करावा लागत होता. या रस्त्याची दुरुस्ती करा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. मात्र तिची दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर शिवशक्ती मिलन आणि वरद मिलन या ग्रुपच्या सदस्यांनी श्रमदान करायचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी या कामास सुरवात केली. ते पाहून इतरही नागरिक या श्रमदानात सहभागी झाले. कोणी श्रमदानासाठी फावडे दिले; तर कुणी पाटी आदी साहित्य दिले. काहींनी खड्डे भरण्यासाठी माती, राडारोडा दिला. विशाल चौधरी, सच्चितानंद चिटणीस, विशाल जोशी, ब्रिजमोहन पाटील, श्रीपाद महाजन, अभिजित दामले यांच्यासह लहान मुले व नागरिक या श्रमदानात सहभागी झाले होते. 

ग्रामपंचायत हद्दीत येणारा हा भाग खासगी हद्द होती. रस्ते ताब्यात दिले नसल्याने तेथे ग्रामपंचायत काही करू शकत नव्हती. धायरी ग्रामपंचायत हद्दीत येणारा हा भाग आता नव्याने पुणे महापालिकेत समाविष्ट झाला आहे. हद्दीलगतची गावे समाविष्ट केल्याने धायरी गावदेखील महापालिकेत आले आहे. त्यानंतरही येथील रस्ते करण्याची विनंती नागरिकांनी सुरूच ठेवली. मात्र त्याला प्रशासनाचा त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर नागरिकांनी खड्डे बुजविले. आमदार भीमराव तापकीर, पंचायत समिती सदस्य अश्‍विनी पोकळे, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, नीता दांगट, राजश्री नवले यांच्या सहकार्याने उर्वरित खड्डे अखेर बुजविण्यात आले.