‘फुटबॉल वर्ल्ड कप’मध्ये झोपडपट्टीतील मुलांना संधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

पुणे - आई-वडिलांनी मोलमजुरी करून मुलांचे पोट भरायचे. त्यामुळे या मुलांना स्वप्न पाहणेही दुरापास्त! परंतु जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर संधीचे सोनेही करता येऊ शकते. हेच औंध, निगडी, आकुर्डी, थेरगाव येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांनी सिद्ध केले असून येथील तब्बल तीस मुलांना स्वीडनच्या गोथिया वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.

एसकेएफ कंपनीच्या सहकार्याने हे विद्यार्थी स्वीडनच्या दौऱ्यावर गेले आहेत. गोथिया वर्ल्ड कप स्पर्धेत जगभरातून चाळीस देश सहभागी होतात. भारतातून दोन संघ यात सहभागी झाले आहेत. ही मुले १३ जुलै रोजी स्वीडनला रवानाही झाली. दहा दिवसांच्या या स्पर्धेत चौदा वर्षे वयोगटातील संघात मुलांचा आणि अकरा वर्षे वयोगटाखालील संघात मुलींचा समावेश आहे. विशेषतः महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या आणि आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांनाच एसकेएफ कंपनीतर्फे अर्थसाहाय्य करण्यात येते. कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) अंतर्गत विद्यार्थ्यांना सहकार्य केले आहे. औंध येथील कुलदीप भंडारी, शफीक खान, नीरज माने, जय सकट हे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यांना प्रशिक्षक रवी दुर्गा आणि दीपक भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले. 

दुर्गा म्हणाले, ‘‘अत्यंत गरीब कुटुंबातील ही मुले आहेत. त्यांच्यातील गुण हेरून त्यांना प्रशिक्षण दिले.’’ 

एसकेएफ कंपनीच्या प्रोग्रॅम मॅनेजर पल्लवी पवार म्हणाल्या, ‘‘गेली बारा वर्षे कंपनीतर्फे उपक्रम राबविण्यात येतो. सुरवातीस क्रिकेट, हॉकी खेळासाठी प्रोत्साहन देत होतो. गेल्या पाच वर्षांपासून फुटबॉलसाठी प्रशिक्षण देत आहोत. ’’