आदिवासी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी 'अविरत'ची धडपड

दीपेश सुराणा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

"आदिवासी विद्यार्थ्यांसाठी फेसबुक फ्रेंडच्या मदतीने शालोपयोगी साहित्य देण्याचा उपक्रम राबविला. आगामी वर्षभरात एक हजार विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ देण्याचे नियोजन आहे.''
- नीलेश पिंगळे, अध्यक्ष, अविरत फाउंडेशन.

पिंपरी: सध्याच्या तरुणाईमध्ये अखंड ऊर्जा आहे. तरुणांनी एकत्र येऊन विधायक कामाचा वसा घेतला, तर ते नक्कीच सामाजिक कार्याचा मोठा डोंगर लीलया पेलू शकतात. तरुणांच्या एका गटाने स्थापन केलेल्या अविरत फाउंडेशनची (थेरगाव) आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी अव्याहत धडपड सुरू आहे. "फेसबुक'वरील एका सकारात्मक पोस्टच्या माध्यमातून सुरू झालेल्या या प्रवासाला आता एक विधायक वळण मिळाले आहे.

"अविरत'ने सुरवातीला चांगल्या स्थितीतील जुने कॉम्प्युटर जमा करून आदिवासी पाड्यातील शाळांमध्ये देण्याची मोहीम हाती घेतली. त्यासाठी फेसबुकच्या माध्यमातून आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. 6 कॉम्प्युटर जमा झाले. रायगड आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन शाळा आणि पानशेतजवळील (जि. पुणे) दोन शाळांमध्ये कॉम्प्युटर दिले. नोव्हेंबर 2016 पासून या उपक्रमाला सुरवात झाली. कॉम्प्युटर देत असताना काही शाळांकडून विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य देता येईल का, अशी विचारणा सुरू झाली. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शालेय साहित्य देण्याचे नियोजन संस्थेने केले, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश पिंगळे यांनी दिली.

संस्थेने त्यासाठी जून-2017 मध्ये "बॅक टू स्कूल' हा उपक्रम हाती घेतला. विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यासाठी प्रत्येकी 250 रुपयांची मदत स्वीकारली. फेसबुकवरील पोस्ट पाहून सुरवातीला 10 ते 15 जणांकडून मदत मिळाली. त्यानंतर मदतीचा ओघ वाढत गेला. धुळे येथील उपशिक्षिका स्मिता सराफ यांनी फेसबुकवरील ही पोस्ट पाहिली. त्यांनी कापडणे (जि. धुळे) येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक चारमधील 80 आदिवासी मुलांसाठी शालेय साहित्य देण्याची मागणी केली. अविरत फाउंडेशनची फेसबुकवरील पोस्ट पुण्यात "शेअर' झाल्यानंतर प्रयत्न सोशल ऑर्गनायझेशनतर्फे उपक्रमासाठी मदत मिळाली. त्यांच्या सहकार्याने संबंधित शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले. त्याचबरोबर जांभूळवाडी आणि धोतरेवाडी (जि. रायगड) येथील शाळांमध्येदेखील शालोपयोगी साहित्य दिले. एकूण 156 विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला. विक्रम शेळके, सुभाष ठोंबरे, सुजित ननावरे, उमेश गायकवाड आणि सम्राट मित्रमंडळाचे सदस्य यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :