कचऱ्यातून विश्‍व घडविणारा अवलिया

कचऱ्याचा पुनर्वापर - टाकाऊ टायरपासून तयार केलेली आसन व्यवस्था
कचऱ्याचा पुनर्वापर - टाकाऊ टायरपासून तयार केलेली आसन व्यवस्था

टाकाऊपासून नव्या अभिनव वस्तू तयार करण्याचा छंद जोपासला आणि घरातील, संस्थेतील आणि शाळेतील कचऱ्यातून ‘उत्तरा पर्यावरण शाळा’ हे नवे विश्‍व निर्माण केले. अशी अवलिया व्यक्ती सर्पतज्ज्ञ नीलिमकुमार खैरे यांच्याशी साधलेला संवाद...

नीलिमकुमार यांनी मावळ तालुक्‍यातील कार्ल्याजवळ ‘उत्तरा पर्यावरण शाळे’ची स्थापना केली आहे. या शाळेला दररोज पन्नासहून अधिक विद्यार्थी भेट देतात. शाळेतून एकही कागदाचा तुकडा शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर जात नाही, अशी आहे ही शाळा.

प्रश्‍न - घरच्या घरी ‘प्लॅस्टिक’चा पुनर्वापर कसा करता येईल?
उत्तर - निश्‍चितच. प्लॅस्टिकमध्ये क्रूड ऑइल (पेट्रोलियम उत्पादन) हा प्रमुख घटक असून, त्याचे प्रमाण ६० टक्के असते. आम्ही घरातल्या सगळ्या प्लॅस्टिकचे छोटे-छोटे (म्हणजे एक इंच बाय एक इंच) तुकडे करतो आणि ते पाच लिटरच्या कुकरमध्ये टाकतो. त्या कुकरला शिटीच्या वरती एक पाइप जोडलेला आहे. कुकरपासून दोन ते अडीच फुटांवर एका प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये पाणी घेऊन त्यात त्या पाइपचे दुसरे टोक बुडविलेले आहे. त्या कुकरला सोलरचे पॅनला लावून उष्णता देतो, तेव्हा प्लॅस्टिकचे तुकडे वितळले जातात, त्यातून वाफ तयार होते. ती वाफ पाइपद्वारे पाण्याच्या बाटलीत जाते. त्या वाफेतून आलेले क्रूड ऑइल पाण्यावर तरंगते. ते जळाऊ म्हणून वापरता येते. एक किलो प्लॅस्टिकमधून ६०० मिलिलिटर तेल घरच्या घरी मिळू शकते. हे तेल स्टोव्ह, जनरेटरसाठी वापरता येईल. सोसायटीमध्येही हा प्रकल्प सहज शक्‍य आहे.

ओला कचरा जिरविण्याचे पर्याय?
- ‘झीरो गार्बेज’ हे प्रत्यक्षात आणले पाहिजे. घरात छोट्या-छोट्या बॉक्‍सेसमध्ये हा कचरा जिरविता येतो. घरात बऱ्यापैकी जागा असल्यास सोमवार, मंगळवार, असे प्रत्येक दिवसानुसार बॉक्‍सेस करा. त्यात त्या-त्या वारी ओला कचरा टाकून तो गांडुळामार्फत जिरविता येईल. अनेक ठिकाणी असे गांडूळखत प्रकल्प आहेत; परंतु त्याची निगा व्यवस्थित राखली न गेल्याने त्यातील बरेचसे प्रकल्प बंद आहेत. दररोज एकाच खड्ड्यात किंवा बॉक्‍समध्ये सातत्याने कचरा टाकत राहिलो, तर गांडुळांनाही तो खात येणार नाही. हे आपण गृहीतच धरत नाही. त्यामुळे आठवड्याच्या प्रत्येक दिवसाचे वेगळे खड्डे खणा किंवा बॉक्‍स तयार करा आणि घरच्या घरी ओला कचरा जिरवा.

टाकाऊ कागदातून कलात्मकतेला वाव मिळतो का? 
- हो अर्थात, कागदाचे तुकडे पाण्यात काही काळ बुडवून ठेवून त्याचा लगदा तयार करा. या लगद्यात फेवीकॉल टाकून त्यापासून वेगवेगळ्या कलाकृती साकारता येतील. याच पद्धतीने आम्ही गणपतीची सुबक मूर्ती तयार करतो आणि विद्यार्थ्यांनाही ‘श्रीं’ची मूर्ती बनवायला शिकवितो. तुम्ही या लगद्यापासून वेगवेगळ्या वस्तू तयार करू शकता.

‘टायर’च्या कचऱ्याचे काय?
- आपण गाडीचे टायर बदलायला जातो, त्या वेळी बदलेला टायर आपण गॅरेजवाल्याकडेच ठेवतो. गॅरेजवाले हा टायर वीटभट्ट्यांना अत्यंत अल्पदरात देतात. विटा भाजण्यासाठी या टायरचा वापर केला जातो. परिणाम मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. खरंतर टायरचे विघटन व्हायला तब्बल २० लाख वर्षे लागतात. त्यामुळे नागरिकांनीही टायरचा वापर करताना काळजी घ्यायला हवी. टायरचा वापर घरातील वेगवेगळ्या वस्तू म्हणूनही करता येईल. झाडे लावण्यासाठी किंवा आसन व्यवस्था म्हणूनही टायर वापरता येतील.

कचरामुक्त शहरासाठी काय करता येईल?  
- प्रत्येक वेळी सरकारला नावे ठेवण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा आपणच काही गोष्टी स्वीकारायला हव्यात. प्लॅस्टिकचा वापर शक्‍यतो टाळा. समजा प्लॅस्टिक वापरल्यास त्याचा पुनर्वापर करत राहा. प्लॅस्टिकच्या वस्तूला ‘नो’ म्हणायला शिका. वयाने मोठ्या असणाऱ्या लोकांच्या मानसिकतेत क्वचित बदल होईल; परंतु लहान मुलांमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण, कचरा जिरविणे यांचे संस्कार व्हायला हवेत. प्लॅस्टिकच्या विक्रीला विरोध करायला पाहिजे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com