भाजीपाला लागवडीतून विद्यार्थ्यांना श्रमाचे धडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

राजापूर - तालुक्‍यातील नाणार येथील जिल्हा परिषद शाळा नं. १ मध्ये गेल्या तीन वर्षापासून पित्रे फाऊंडेशन मुंबई, सिद्धी ट्रस्ट देवरूख आणि रत्नागिरी जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमान शाळेमध्ये शालेय परिसर विकास प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पामध्ये पालकांसह विद्यार्थी श्रमदानातून विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करतात. त्यातून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर श्रमाचे मोलही समजते.

राजापूर - तालुक्‍यातील नाणार येथील जिल्हा परिषद शाळा नं. १ मध्ये गेल्या तीन वर्षापासून पित्रे फाऊंडेशन मुंबई, सिद्धी ट्रस्ट देवरूख आणि रत्नागिरी जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमान शाळेमध्ये शालेय परिसर विकास प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पामध्ये पालकांसह विद्यार्थी श्रमदानातून विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करतात. त्यातून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर श्रमाचे मोलही समजते. या प्रकल्पामध्ये तयार होणाऱ्या फळभाज्या पोषण आहारासाठी उपयुक्त ठरत आहेत.
गेल्या तीन वर्षापासून शाळा परिसरात विकास प्रकल्प राबविला जात आहे.

पावसाळ्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी पालकांसह विद्यार्थी श्रमदानातून योगदान देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकामध्ये अनुभवल्या जात असलेल्या शेतकऱ्यांचे शेतामधील योगदान आणि शेतकऱ्याच्या मूल्याची प्रत्यक्ष अनुभूती येते. या प्रकल्पामध्ये कारली, दोडका, वाली, काकडी, भेंडी, मिरची आदी विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड केली जाते. तयार होणाऱ्या फळभाज्या बाजारामध्ये विकण्याऐवजी शाळेतील पोषण आहारामध्ये वापरल्या जात आहेत.

प्रशालेचे मुख्याध्यापक हिदायत भाटकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश घाटे, प्रकाश नार्वेकर, दीपक मणचेकर, अरुण पेडणेकर, श्रीकृष्ण पेडणेकर आदींच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पाचा प्रकल्पप्रमुख म्हणून श्री. पवळे काम पाहत आहेत. बागकामप्रमुख म्हणून श्री. मुळे काम पाहत आहेत. 

औषधी वनस्पतींचाही समावेश
शालेय परिसर विकास प्रकल्पातर्गंत शाळेमध्ये फळभाज्या लागवड केलेली आहे. तसेच या व्यतिरीक्त शाळेमध्ये विविध प्रकारची शोभेची आणि फुल झाडे मिळून सुमारे शंभरहून अधिक झाडांची लागवड करण्यात आली आहे. याशिवाय पपई, पेरु, सिताफळ, काजू, केळी आदी फळझाडांसह आवळा, हिरडा, कोरफड, अडुळसा आदी औषधी झाडांचाही यात समावेश आहे.