पिकाचा फोटो पाठवा अन्‌ रोगनिदान-उपचार करा..!

संतोष भिसे
रविवार, 17 सप्टेंबर 2017

शेतकऱ्यांच्या बांधावर तंत्रज्ञान पोहोचविले पाहिजे, असे सभेत टाळ्या घेण्यासाठीचे वाक्‍य. त्यासाठीची प्रत्यक्ष कृती मात्र फारशी होत नाही. छोट्या-छोट्या प्रयोगांतून शेतकऱ्यांना खूप काही मदत होऊ शकते. पिकावर पडणाऱ्या रोगाची नेमकी आणि त्यावरील उपचारांबाबत शेतकऱ्याला नेमकी माहिती नसते. अशी माहिती देणारी आणि सहज सोप्या पद्धतीने हाताळता येणारी संगणक प्रणाली मिरजेतील संजय भोकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विकसित केली आहे, त्याविषयी...

सांगली - शेतीत औषधांचा वापर वाढला आणि तशी पिकांवरील रोगराईही वाढली. द्राक्ष, डाळिंब, ऊस अशा पिकांवर नाना प्रकारचे रोग पडतात. त्यातून पिकाचा बचाव होण्यासाठी योग्यवेळी अचूक औषध योजना हवी. बऱ्याचदा शेतकरी या पिकाबद्दलची तोंडी माहिती तो दुकानदार किंवा तज्ज्ञांना देतो. तज्ज्ञही त्या माहितीच्या आधारे अंदाज बांधतात. बऱ्याचदा रोगाची तीव्रता एखाद्या पिकाच्या नमुन्यावरून लक्षात येत नाही. या साऱ्या समस्यांचा सूक्ष्मपणे विचार करून भोकरे इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी रोगाचे नेमके निदान व उपचार करणारी संगणकप्रणाली विकसित केली आहे. त्याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना होत आहे. भविष्यात कृषी विभागाच्या मदतीने त्याचा लाभ राज्यभरातील  शेतकऱ्यांना देण्याचा या विद्यार्थ्यांचा मानस आहे. 

इमेज प्रोसेसिंग अर्थात प्रतिमा विश्‍लेषण असे या  प्रणालीचे मध्यवर्ती सूत्र आहे. पिकावर आढळलेल्या रोगाच्या लक्षणांचे छायाचित्र मोबाईलच्या मदतीने शेतकऱ्याने संबंधित व्हॉट्‌सॲप क्रमांकावर पाठवायचे. त्यानंतर काही मिनिटांतच त्या रोगाची तपशीलवार माहिती शेतकऱ्याला मिळते. सध्या शेतकरी पारंपरिक ज्ञान-अनुभवाच्या आधारे रोगनिदान करतो. त्याची माहिती दुकानदाराला दिल्यानंतर अंदाजेच औषधयोजना केली जाते. हा सारा अंदाजे खेळ असतो. फसले तर पीक वाया जाण्याचा धोका कायम असतो. या संगणक प्रणालीवर आता एकूण ४५ रोगांची माहिती संकलित केली आहे. पिकांवरील रोगांची प्रत्यक्ष छायाचित्रे संकलित केली आहेत. एकाच प्रकारच्या रोगाची अनेक छायाचित्रे, त्याचे विश्‍लेषण, औषध योजना असा सारा डेटा संकलित केला आहे.

छायाचित्र पडल्यानंतर संगणक प्रतिमा विश्‍लेषण तंत्राद्वारे रोग व त्याचा इत्थंभूत तपशील डेटा बॅंकमधून निवडला जातो आणि तो त्या शेतकऱ्याला पाठविला जातो. अचूक रोगनिदान झाल्यास औषध व्यवस्थापन सोपे जाते. सध्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्य मानल्या गेलेल्या द्राक्ष, ऊस आणि डाळिंब नगदी पिकांचीच डेटा बॅंक आहे. इतर पिकांचा डेटाही सध्या गोळा केला जात आहे. त्यानंतर राज्याच्या कृषी विभागाशी संपर्क साधला जाईल. त्यातून स्वतंत्र ॲप लाँच करून शेतकऱ्यांना फायदा मिळवून दिला जाईल. प्रा. एम. एम. कांबळे,  विभागप्रमुख एस. एम. ग्रामोपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली साहील जमादार, बसवराज उप्पर व अर्चना वनवे या विद्यार्थ्यांनी ही प्रणाली विकसित केली आहे.