डोंगरदऱ्यांनीही धरली आधुनिकतेची कास

विशाल पाटील
शनिवार, 17 जून 2017

सातारा - पाटण तालुक्‍यातील डोंगरदरीत वसलेले गाव...आधुनिक जगताच्या दहा पावले मागे असलेले... हे बदलण्यासाठी गावकरी पुढे आले अन्‌ यात्रेच्या वर्गणीतील २५ टक्‍के रक्‍कम शाळेसाठी खर्च केली... ज्या वाडीत ‘टीव्ही’ही नाहीत अशा भैरेवाडीत (ता. पाटण) प्राथमिक शाळेत ११ विद्यार्थ्यांच्या हाती टॅब आले... दुय्यम स्थानावर असलेली शाळा आता गावकऱ्यांसाठी जिव्हाळ्याची झाली आहे.

सातारा - पाटण तालुक्‍यातील डोंगरदरीत वसलेले गाव...आधुनिक जगताच्या दहा पावले मागे असलेले... हे बदलण्यासाठी गावकरी पुढे आले अन्‌ यात्रेच्या वर्गणीतील २५ टक्‍के रक्‍कम शाळेसाठी खर्च केली... ज्या वाडीत ‘टीव्ही’ही नाहीत अशा भैरेवाडीत (ता. पाटण) प्राथमिक शाळेत ११ विद्यार्थ्यांच्या हाती टॅब आले... दुय्यम स्थानावर असलेली शाळा आता गावकऱ्यांसाठी जिव्हाळ्याची झाली आहे.

भैरेवाडी म्हणजे अतिदुर्गम गाव. डांबरी रस्ताही नाही. शेती, बांधकाम, वीटभट्टीवर रोजंदारीला जाणे हेच मुख्य काम. पावसाळ्यात शाळा परिसरात गुडघाभर चिखल साचलेला असतो. गावच्या यात्रेत मुंबईस्थित गावकरी येतात, मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर खर्च केला जातो. पहिली ते पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेची दोन शिक्षकी शाळा आहे. शाळेत मुख्याध्यापक म्हणून विजय लिंगाडे व नितीन सावंत हे शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेत ११ विद्यार्थी शिकतात. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब देऊन शाळा पूर्णपणे टॅबयुक्त करण्याचा विचार केला. निधीची गरज पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांकडून वर्गणी गोळा करण्याचा निर्णय घेतला. दहा फेब्रुवारीला ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा गावात भरली. यात्रेसाठी पुणे, मुंबई येथील गावकरी लोकवर्गणी काढून करमणुकीवर खर्च करतात. त्याऐवजी शाळेतील मुले सांस्कृतिक कार्यक्रम करतील, अशी संकल्पना मांडली. ती ग्रामस्थांना आवडली. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमही चांगला करून रंगत आणल्याने त्यांना बक्षिसे देण्यात आली. 

या कार्यक्रमाचे  निमित्त साधून मुलांना टॅब देण्याचे महत्त्व शिक्षकांनी ग्रामस्थांना पटवून दिले. अन्य कार्यक्रमांसाठी संकलित होणाऱ्या लोकवर्गणीतील २५ टक्के निधी शाळेसाठी खर्च करण्याचे ठरले. यात्रेच्या दोनच दिवसांत गावातील लोकवर्गणीतून ७० हजारांचा निधी जमा झाला. बालभारती संस्थेचे संचालक डॉ. सुनील मगर, ढोरोशीतील केंद्रप्रमुख सुरेश मगर यांनी प्रत्येकी एक आणि लोकसहभाग मिळून ११ टॅबची खरेदी केली. शिल्लक निधीतून फर्निचर, लाइट फिटिंग, मेमरी कार्ड आदी साहित्याची खरेदी झाली. 

मुलांना आता टॅबवरील शिक्षण दिले जाते. टॅबमध्ये ६० हून अधिक शैक्षणिक ॲप्लिकेशन्स (ॲप्स) सेट केले असून, ती संख्या वाढविली जात आहे. यामध्ये मजेशीर गणिते, इंग्रजी भाषा कशी आत्मसात करावी, इंग्रजी व्याकरण, करमणुकीचे विविध उपक्रम आदींचा समावेश आहे. प्रत्येकाकडे स्वतंत्र टॅब असल्याने जास्त वेळ वापर करतात.

...हे गवसले
विद्यार्थी गिरवतात टॅबवर धडे
व्यावसायिक ज्ञानासाठी सहली
दप्तरांचे ओझे झाले कमी 
शाळेबद्दल ग्रामस्थांना आदर
अंधश्रद्धा लागली कमी होऊ

शाळेविषयीची छायाचित्रे, व्हिडिओ पाहा...
https://www.facebook.com/satarasakal/