बेवारस मृतदेहांवर ‘तो’ करतो अंत्यसंस्कार

शैलेन्द्र पाटील
शनिवार, 27 मे 2017

जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या आवारात गोरगरिबांना जेवणाचे मोफत डबेही 

सातारा - तो वंचित, दुर्लक्षित कुटुंबांना अंत्यविधीचे साहित्य मोफत पुरवतो. कधी निराधारांचा आधार बनून तो मुलाच्या नात्याने बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतो, त्यांचे अंत्यविधी पार पाडतो. सायंकाळ झाली की त्याला जिल्हा सरकारी रुग्णालयात जाण्याचे वेध लागतात, कारण सुमारे १२५-१५० लोक तो घेऊन जाणार असलेल्या जेवणाच्या डब्यांच्या प्रतीक्षेत वाटेकडे डोळे लावून बसलेली असतात..! 

जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या आवारात गोरगरिबांना जेवणाचे मोफत डबेही 

सातारा - तो वंचित, दुर्लक्षित कुटुंबांना अंत्यविधीचे साहित्य मोफत पुरवतो. कधी निराधारांचा आधार बनून तो मुलाच्या नात्याने बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतो, त्यांचे अंत्यविधी पार पाडतो. सायंकाळ झाली की त्याला जिल्हा सरकारी रुग्णालयात जाण्याचे वेध लागतात, कारण सुमारे १२५-१५० लोक तो घेऊन जाणार असलेल्या जेवणाच्या डब्यांच्या प्रतीक्षेत वाटेकडे डोळे लावून बसलेली असतात..! 

रवींद्र कांबळे (रा. मंगळवार पेठ, सातारा) त्यांचे नाव! पोवई नाक्‍यावरील भाजी मंडईतील रवींद्र कांबळे म्हणजे बहुपरिचित व्यक्तिमत्त्व! रवींद्र मंडईत दिसला नाही, असा दिवस नाही. १५-१६ वर्षांपूर्वी मंडईत भाजी विकणाऱ्या रवींद्रने कल्पकतेने जोड व्यवसाय केले, व्यवसाय वृद्धीसाठी कष्ट उपसले. साऱ्या कुटुंबीयांनी त्याला साथ दिली. आता रवीला लोक ‘रवीशेठ’ म्हणून  हाक मारतात. त्याच्याकडे ‘होंडासिटी’ आली. मात्र, अद्यापि रवींद्रचे पाय जमिनीवर आहेत. 

व्यवसायात स्थिरस्थावर झाल्यानंतर रवींद्र यांनी संजीवन बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था स्थापन केली. ११ ऑगस्ट २०१६ मध्ये त्याने संस्थेमार्फत गरजूंना मोफत अंत्यविधी साहित्य वाटप हा उपक्रम सुरू केला.

कापड, ताट, गुलाल- बुक्का, अगरबत्ती आदी सुमारे ६०० ते ७०० रुपयांचे साहित्य ते गरजूंना मोफत पुरवतात. बघता- बघता लोकांमध्ये या उपक्रमाचा प्रसार झाला. केवळ सातारा तालुकाच नव्हे तर लगतच्या जावळी व कोरेगाव तालुक्‍यातूनही गरजू लोक रवींद्रकडे साहित्य नेण्यासाठी येतात.

गावचा सरपंच किंवा गावातील एका मान्यवराच्या केवळ फोनवरील खातरजमेवर अंत्यविधीचे साहित्य सुपूर्द केले जाते. आतापर्यंत सुमारे २०० गरजूंना हे साहित्य त्यांच्या वेळेला उपयोगाला पडले. जिल्हा सरकारी रुग्णालयात एखाद्याचा मृत्यू झाला, त्याच्या सोबतची व्यक्ती आर्थिक दुर्बल, निराधार असते. अशावेळी लोक रवींद्रचा मोबाईल नंबर देतात. हातातले काम सारून तो जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतो! 

लोक स्वत:च्या वाढदिवसाला रिमांड होम अथवा जिल्हा रुग्णालयात अन्नदान करतानाचे फोटो प्रसारमाध्यमांकडे लगेच पाठवतात. रवींद्र कांबळे गेले आठ महिने जिल्हा रुग्णालयात अन्नछत्र चालवतोय. त्याने कधीही या उपक्रमाचे छायाचित्र कोणत्या प्रसारमाध्यमांकडे पाठवले नाही. जिल्हा रुग्णालयात सकाळच्या वेळी माहेश्‍वरी समाज बांधव हा उपक्रम राबवितात.

रुग्णाकरिता रुग्णालयातर्फे अन्न पुरविले जाते. मात्र, रुग्णाबरोबर देखभालीसाठी थांबलेल्या परगावच्या नातेवाईकाची मात्र गैरसोईमुळे अबाळ होते. बऱ्याचदा हे लोक अर्धपोटी राहून रात्र काढतात. रवींद्र कांबळे यांनी ही गरज ओळखून रात्रीच्या जेवणाचे डबे मोफत पुरविण्यास सुरवात केली. रोज सव्वाशे ते दीडशे जेवणाचे डबे घेऊन तो रुग्णालयातील गरजूंना देतो. सण- वार याप्रमाणे कधी गोडधोडाचे जेवणही दिले जाते. नवरात्रीच्या काळात उपवासाचे जिन्नस दिले जातात. कधीमधी बाल रुग्ण व इतर रुग्णांना संस्थेतर्फे फळे दिली जातात. हे सगळ रवी एकटा करतो असे नाही. समाजातील दानशूरांच्या मदतीचा हात रवींद्रच्या डोक्‍यावर असतो. 

परिस्थितीमुळे कधीकाळी वडिलांचे अंत्यकर्मही मला व्यवस्थित करता आले नाहीत. जेवणाची तर कायम आबाळ राहिली. ही परिस्थिती इतरांवर ओढवू नये, या जाणिवेतून मी हे उपक्रम सुरू केले. अर्थातच समाजातूनही मला पाठबळ मिळते.
- रवींद्र कांबळे, अध्यक्ष, संजीवन बहुउद्देशीय सामाजिक संस्था

काही सुखद

धुळे : येथील एका बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणाने दुचाकी (मोटार सायकल) दुरुस्तीच्या कामातून स्वत:सह इतर तीन तरुणांना...

02.09 PM

राजापूर - तालुक्‍यातील नाणार येथील जिल्हा परिषद शाळा नं. १ मध्ये गेल्या तीन वर्षापासून पित्रे फाऊंडेशन मुंबई, सिद्धी ट्रस्ट...

05.12 AM

शासकीय मदतीचा धनादेशही मिळाला, ‘सकाळ’च्या पाठपुराव्याला यश औसा - तालुक्‍यातील समदर्गा येथील शेतकरी शंकर गिराम यांनी नापिकी व...

सोमवार, 18 सप्टेंबर 2017