स्थलांतरितांच्या मुलांसाठी दिघीत फुलली ‘अक्षरशाळा’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

प्रा. दत्तात्रेय इंगळे यांचा उपक्रम; वंचित मुले गिरवताहेत ‘अबकड’चे धडे

प्रा. दत्तात्रेय इंगळे यांचा उपक्रम; वंचित मुले गिरवताहेत ‘अबकड’चे धडे

पिंपरी - गुलबर्गा जिल्ह्यातील बेरड समाजातील कुटुंबं... गावाकडे हाताला काम नाही म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात आलीत... गेल्या अकरा वर्षांपासून भोसरी-दिघी परिसरातील मोकळ्या जागेत पालं ठोकून मिळेल ते काम करत जगण्यासाठी व जगवण्यासाठी धडपड सुरू आहे... मात्र कोवळ्या वयातील मुलं शाळेची वाट न धरता आई-वडिलांची करंगळी पकडत कामाच्या ठिकाणी जातात... बालपण चुरगाळतंय... कारण वंचितांचं अन्‌ दुर्लक्षितांचं जगणं माथी मारलंय ना..? नेमकी ही विदारकता लक्षात घेऊन ‘जीवनविद्या परिवर्तन ट्रस्ट’ यांनी या वस्तीतील मुलांना अक्षरओळख व अंकओळख व्हावी यासाठी ‘अक्षरशाळा’ सुरू केली आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्याच्या वाटा आता ‘अक्षरशाळा’तून फुलणार आहेत.

दिघी येथील प्रा. दत्तात्रेय इंगळे यांनी शाळेतील अध्ययनाचे काम बाजूला सारून समाजातील शिक्षणांमधील तफावत दूर करण्यासाठी जीवन विद्या परिवर्तन ट्रस्टच्या माध्यमातून शालाबाह्य व शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याचा सकारात्मक प्रयत्न केला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी अकरा वर्षांपूर्वी दिघीत आलेली अकरा कुटुंबे रस्त्यांच्या कडेला मोकळ्या जागेत झोपड्यांमध्ये स्थिरावले आहेत. ही कुटुंबे कामाच्या शोधार्थ स्थलांतरित होत असल्याने त्यांच्या मुलांना शाळेची ओळखही नाही. त्यामुळे प्रा. इंगळे यांनी पालावरच बालसाक्षरता मोहिमेद्वारे आशादायक पाऊल उचलले आहे. नुकतेच औपचारिक पद्धतीने शाळेचे उद्‌घाटन झाले. या १८ मुलांना इंग्रजी व मराठी अक्षर आणि अंकओळख व्हावी, या दृष्टीने पाटी-पेन्सिल, अंक पुस्तक आणि ड्रॉइंग बुक दिली आहेत. या परिसरात दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ही ‘अक्षरशाळा’ भरत आहे. त्यातील बरीच मुले कन्नड भाषक आहेत. पालकांच्या मदतीने त्यांना त्यांच्या भाषेत शिकविले जाते. प्रा. इंगळे यांना त्यांची सहचारिणी सारिका इंगळे, सुजाता शिंदे, सुहास शिंदे या भांवडाचीदेखील मदत होत आहे. मनोरंजनपर खेळ मुलांना शिकविले जातात. मुलांना छान छान गोष्टी सांगितल्या जात आहेत. वहीत चित्रे काढायला, रंगवायला शिकवले जाते. मुलांना शाळेची गोडी लागावी यासाठी त्यांना खाऊ दिला जात आहे. ही मुले आता अक्षरे गिरवू लागली आहेत.

शिक्षण हक्क कायद्याने सहा ते १४ या वयोगटातील मुलांना शिक्षणाचा हक्क बहाल केला आहे; परंतु आजच्या घडीला लाखो मुले शिक्षणापासून वंचित आहेत. साक्षर व सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. या मुलांच्या परिवर्तनासाठी सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे करावा.
- प्रा. दत्तात्रेय इंगळे, अध्यक्ष, जीवनविद्या परिवर्तन ट्रस्ट