विद्यार्थ्यांनी बनवला कमी वजनाचा नांगर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

विद्यार्थ्यांकडे कल्पकता असते. त्यांच्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही नेहमी प्रोत्साहन देतो. समाजाच्या उपयोगी विविध अवजारे, उपकरणे विद्यार्थी तयार करतात. त्यांचा आम्हाला अभिमान आहे. 

- प्राचार्य डॉ. हेमंत मांडवे, "केबीपी' अभियांत्रिकी महाविद्यालय, सातारा 

सातारा -येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी हे शेती व शेतकऱ्यांच्या उन्नतीची दृष्टी जपू लागलेले दिसतात. या महाविद्यालयातील प्रॉडक्‍शन विभागातील विद्यार्थ्यांनी कमी वजनाचा व सुलभ शक्तिशाली नांगर तयार केला आहे. त्यांच्या कल्पकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुंबईतील आयआयटीच्या तज्ज्ञांनीही या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 

अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत असताना विद्यार्थ्यांना प्रोजेक्‍ट करावा लागतो. ज्ञानेश्‍वर बिरादार, लखन अवघडे, सोहेब सिकंदर अर्जुन पवार या विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शक प्राध्यापकांनी प्रोजेक्‍ट दिला होता. शेतीत नांगरटीला जास्त महत्त्व असते. जितकी नांगरट खोल तितका तणाचा नायनाट चांगला होतो. माती मोकळी होऊन इतर आंतरमशागती, पेरणीचे काम सोपे होते. आता नांगरटीचे बहुतेक काम ट्रॅक्‍टरद्वारे केले जाते. ट्रॅक्‍टरला कमी वजनाचा नांगर असल्यास ओढणे सोपे होईल, या विचारातून विद्यार्थ्यांनी कमी वजनाचा नांगर तयार करण्याचे ठरविले. स्वतः नांगराचे डिझाईन तयार केले. साधारण नांगराचे वजन 470 किलो असते. विद्यार्थ्यांनी वजनात घट करून 430 किलो वजनाचा नांगर तयार केला. तो स्वयंचलित रिव्हर्सिबल असल्याने चालकाचा ताणही कमी होण्यास मदत होते. या नांगराला विद्यार्थ्यांनी "हायड्रोलिक रेव्हर्सिबल प्लफ' असे नाव दिले आहे. हा नांगर तयार करताना येथील शिवम ऍग्रो कंपनीने व कंपनीचे संचालक रवींद्र बागेकरी, प्रोजेक्‍ट गाईड आमीर शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उन्नत महाराष्ट्र अभियानांतर्गत आयआयटीच्या (मुंबई) तज्ज्ञांनी नुकतीच महाविद्यालयास भेट दिली. त्या वेळी त्यांनीही या नांगराची पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शेंद्रे (ता. सातारा) येथे नुकत्याच झालेल्या अजिंक्‍यतारा कृषी प्रदर्शनात विद्यार्थ्यांचे कौतुक झाले.