चणे-फुटाणे विक्रेता झाला ट्रॉन्स्पोर्ट व्यावसायिक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

गणेश सकटेने जिद्दीच्या जोरावर घडवले भविष्य - रत्नागिरी जिल्हा बॅंकेने दिला कर्जरूपाने हात

गणेश सकटेने जिद्दीच्या जोरावर घडवले भविष्य - रत्नागिरी जिल्हा बॅंकेने दिला कर्जरूपाने हात

चिपळूण - एखाद्याची आर्थिक परिस्थिती बिकट असली, तरी त्याच्यात व्यवसायाची जिद्द आणि चिकाटी व मेहनत घेण्याची इच्छाशक्ती असली, तरी अपवादानेच बॅंका कर्जपुरवठा करतात; मात्र जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने चिपळूण आगारासमोर चणे-फुटाणे विक्री करणाऱ्या तरुणावर विश्‍वास दाखवला. त्या विश्‍वासाला तडा जाऊ न देता त्या तरुणानेही बॅंकेकडून कर्ज घेत ट्रक खरेदी करून ट्रान्स्पोर्ट व्यवसायात उडी घेतली. जिद्द व चिकाटीच्या जोरावर चणे-फुटाणे विक्रेता गणेश सकटे आज दोन ट्रकचा मालक आणि स्वतःचे हक्काचे घर उभे करण्यात यशस्वी झाला आहे.

शहरातील कावीळतळी येथील गणेश शंकर सकटे १९८७ मध्ये चौथीत असताना त्याची आई नलिनी शंकर सकटे या धुणी-भांडी करायच्या. आजी सौ. हौसाबाई सीताराम मोरे ही आंधळी. धुणी-भांडी करीत आई गणेशला व आजीला सांभाळत होती. गणेश शिक्षण घेत असताना आईला मदत म्हणून चिपळूण बस स्थानकात चणे-शेंगदाणे विकायचा. चणे-शेंगदाणे विकत त्याने दहावीपर्यत शिक्षण घेतले. परिस्थितीमुळे त्याला पुढे शिक्षण घेता आले नाही. तो रिक्षा चालवण्यास शिकला. काही दिवसानंतर रिक्षाधंद्यातून बऱ्यापैकी पैसे मिळू लागले. रिक्षा चालवत असताना चंद्रकांत खंडझोडे यांनी १९९५ ला त्याला मोठी गाडी शिकवली. त्यांच्यासोबत जाऊन गणेश मोठी गाडी चालवायला शिकला. १९९९ मध्ये गणेशचा विवाह झाला. विवेक भिडे यांच्या गाडीवर चालक म्हणून त्याने नोकरी केली. त्यावेळी २ हजार २०० रुपये पगार मिळायचा. त्यावेळी एखादी मोठी गाडी घेऊन व्यवसाय करण्याची जिद्द मनात निर्माण झाली. चिपळूणमध्ये कोणतीही बॅंक कर्ज देण्यात तयार नव्हती. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत तो मोठ्या गाडीचे कोटेशन घेऊन गेला. सहायक सरव्यवस्थापक ए. बी. चव्हाण यांची भेट घेतली. श्री. चव्हाण यांनी विश्‍वास ठेवून आयशर ट्रक खरेदीसाठी २००९ मध्ये जिल्हा बॅंकेकडून ६ लाख ७८ हजाराचे कर्ज दिले. त्यामुळे ९ लाखांचा ट्रक त्याने घेतला. कर्जासाठी जामीन म्हणून तलाठी श्री. लोध यांनी आपली १२ गुंठे जागा बॅंकेस तारण दिली. २००९ मध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने कर्ज दिल्यामुळे गणेशच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. कर्जाची नियमित व मुदतीत परतफेड केली. याच वाहतूक व्यवसायातून कर्ज न घेता त्याने आणखी एक गाडी घेतली. त्यासाठी विवेक भिडे यांनी दोन लाख उसने दिले. मातीचे व कौलारू पद्धतीचे घर असल्यामुळे नवीन घराची आवश्‍यकता होती. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने स्लॅबच्या घरासाठी २०१६ मध्ये साडेसहा लाखांचे कर्ज दिले. या कर्जाचेही गणेश नियमित हप्ते भरत आहे. 

जिल्हा बॅंकेमुळेच स्वत:च्या पायावर उभा असून मला आज प्रतिष्ठा मिळाल्याचे गणेश अभिमानाने सांगतो. गणेशची मोठी मुलगी बारावीत, तर दुसरी मुलगी नववीत, मुलगा पाचवीत आहे. सर्व सुख व प्रतिष्ठा मला जिल्हा बॅंकेमुळेच मिळाली.
- गणेश सकटे, चिपळूण