दृष्ट लागण्याजोग्या संसारापुढे सोनेही पडे फिके 

राजेभाऊ मोगल - सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 4 जानेवारी 2017

औरंगाबाद - नियतीने दृष्टी हिरावली, पण त्यांनी जगण्याची उमेद हरली नाही. जीवनातील "अंधारा'तून मार्ग काढला. इच्छाशक्‍तीच्या बळावर एकमेकांना समजून घेत संसार करत आयुष्य फुलविले. एवढेच नव्हे, तर आपल्या मुलींनाही स्वयंपूर्ण केले. 

औरंगाबाद - नियतीने दृष्टी हिरावली, पण त्यांनी जगण्याची उमेद हरली नाही. जीवनातील "अंधारा'तून मार्ग काढला. इच्छाशक्‍तीच्या बळावर एकमेकांना समजून घेत संसार करत आयुष्य फुलविले. एवढेच नव्हे, तर आपल्या मुलींनाही स्वयंपूर्ण केले. 

आडगाव खुर्द येथे जन्मलेले आणि सध्या सिडकोत वास्तव्यास असलेल्या ठोंबरे दाम्पत्याची ही कथा. कृष्णराव ठोंबरे जन्मजात अंध. घरची स्थिती बेताची तरीही त्यांनी शिक्षणाची कास धरली. अंध शाळेतून दहावीपर्यंत शिक्षण घेतले. बारावी झालेल्या, अंध मंगला यांच्याशी लग्न केले. आता प्रश्‍न निर्माण झाला तो दोघांच्या जगण्याच्या. दोघेही अंध. काम कोण देणार? कसे जगायचे, इत्यादी प्रश्‍न सतावू लागले. शाळेत दोघांनीही खुर्ची विणण्याचे घेतलेले प्रशिक्षण कामी आले. तेच उपजिविकेचे साधन बनले. अपार कष्टातून खुर्ची विणकामात जम बसवला, तशी संसाराची वीणही घट्ट होऊ लागली. यासंदर्भात कृष्णराव, सांगतात, "आम्ही दिवसभर खुर्ची विणायचो. शंभर रुपये मिळायचे. तेव्हा त्यातही चांगले भागायचे. काही दिवसांनी मंगलाबाईंना शिपाई म्हणून नोकरी मिळाली. 25 वर्षांपासून त्या नोकरी करताहेत. त्या अंध असल्या तरी आवाजावरून कार्यालयातील सहकारी, वरिष्ठांना ओळखतात. ये- जा करताना सहप्रवासी सहकार्य करतात. पै-पै जमवून सिडकोत घरही बांधले. शेजारी खूप मदत करतात. फावल्या वेळेत ब्रेल लिपीतील पुस्तके वाचून बौद्धिक भूक भागवतो''. 

ठोंबरे दांपत्याला दोन डोळस मुली आहेत. मोठी कन्या मनीषाचे "बी.ई., तर धाकट्या सरिताचे "एमसीए'पर्यंत शिक्षण झाले आहे. वर्षापूर्वीच एकापाठोपाठ दोघींचीही लग्ने लावून दिली. काबाडकष्टातून मुलांना शिक्षण देणाऱ्या एकाच कुटुंबात या दोघी सुखाने नांदत आहेत. सध्या मनीषा प्राध्यापिका, तर सरिता नोकरीच्या शोधात आहे. ""ठरवल्याप्रमाणे मुली शिकल्या. त्यांची लग्नं झाली. उच्चशिक्षित जावई मिळाले. त्या आनंदात आहेत, याचेच मोठे समाधान आहे. दोन्ही मुलींमुळेच आमचा प्रवास सुखकर झाला. अडचणींवर मात करता आली'', असे ठोंबरे दांपत्य सांगते. 

वारकरी तत्त्वज्ञानामुळे मिळाले बळ 
कृष्णराव ठोंबरे म्हणतात, माझे वडील विठ्ठलराव यांच्यावर संत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांचा मोठा प्रभाव होता. ते कीर्तन करीत. त्यांच्याकडील संस्काराने मी संत साहित्याकडे वळलो. वारकरी तत्त्वज्ञानामुळे अडचणींवर मात करू शकलो. अंधांसाठी योजनांबद्दल ते म्हणतात, ""अधिकार आणि समानसंधी असे बोलले जाते, वास्तवात समस्यांना तोंड द्यावेच लागते. पूर्वी गरज ओळखून मदत केली जात असे. आजही अशीच मदत अंधांसाठी गरजेची आहे.''

टॅग्स