"यूपीएससी' पास; पण रमले रसवंतीत

"यूपीएससी' पास; पण रमले रसवंतीत

पुणे - थंडगार, मधुर चवीचा उसाचा रस हा सगळ्यांच्याच आवडीचा... गरगर फिरणाऱ्या चाकासोबत लयीत वाजणाऱ्या घुंगराचा आवाज ऐकताच आपोआप आपली पावले रसवंती गृहाकडे वळू लागतात. येथे वापरल्या जाणाऱ्या बर्फाबाबत आपण साशंक असतो; परंतु हा सुमधुर चवीचा रस निसंकोचपणे पिण्याचा विश्वास दिला आहे मनोज पाटील या उच्चशिक्षित तरुणाने. मानवी हस्तक्षेपाविना विनाबर्फ थंडगार उसाचा रस तयार करण्याचे अत्याधुनिक मशीन त्याने साकारले आहे. 


धुळ्यातील वडजाई या छोट्याशा गावातून मनोज यांच्या कारकिर्दीची सुरवात झाली. धुळे येथे त्यांनी 2003 मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि स्पर्धा परीक्षांसाठी दुसऱ्याच वर्षी पुणे गाठले. त्याच वर्षी म्हणजे 2004 मध्ये त्यांनी "यूपीएससी‘ची इंजिनिअरिंग आणि त्याबरोबरच "सिव्हिल सर्व्हिसेस‘ अशा दोन्ही परीक्षा दिल्या आणि दोन्ही परीक्षांमध्ये (आयईएस, आयआरएस) पहिल्याच प्रयत्नात चांगल्या गुणांनी ते उत्तीर्ण झाले. "यूपीएससी‘तील यशामुळे "आयआरएस‘ची पोस्टिंगदेखील मिळाली; परंतु ती त्यांनी स्वीकारली नाही. 

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यातच ते अधिक रमले; पण काही तरी वेगळे करण्याची त्यांची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांच्या मुलीच्या रस पिण्याच्या हट्टामुळे त्यांच्या आजपर्यंतच्या विचारचक्राला दिशा मिळाली आणि त्यातून निर्मिती झाली "एसएमएस शुगरकेन ज्यूस‘ची. या माध्यमातून बर्फविरहित स्वच्छ उसाचा रस तयार करण्याची एक वेगळी संकल्पना समोर आली. 


बऱ्याचदा रसवंतीतील बर्फाच्या शुद्धतेबाबत शंका असते. शिवाय तेथे रस काढताना ऊस, मशिन, बर्फ यांची हाताळणी होते. पाटील यांना मानवी हस्तक्षेपाशिवाय उसाचा रस काढायचा होता. एक वर्षाच्या मेहनतीनंतर मशिन तयार करण्यात त्यांना यश आले. त्यांच्या आजपर्यंतच्या अभियांत्रिकीच्या अनुभवाचे ते फलितच होते.
 

आज एसएमएस शुगरकेन ज्यूसच्या मार्केट यार्ड-गंगाधाम चौक आणि भारती विद्यापीठ येथे शाखा सुरू आहेत. देशभरातील व्यावसायिकांकडून या मशिनसाठी मागणी आहे. आरोग्यदायी असलेला उसाचा रस जास्तीत जास्त लोकांर्पंत पोचावा, यासाठी उच्चशिक्षित तरुणांनी केवळ नोकरी करण्यापेक्षा व्यवसायात उतरावे, अशी त्यांची इच्छा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com