अंधारात लाभली ‘विकासा’ची किरणे

Positive story
Positive story

चिखली - आई समजायच्या आतच आजारपणामुळे तिचे निधन झाले. त्यातून सावरतो न सावरतो तोच वडिलांना अर्धांगवायूच्या झटक्‍याने अपंगत्व आले आणि बालपणीच पित्याचा पालक होण्याची वेळ त्याच्यावर आली. वडील असूनही अनाथाचे जिणे नशिबी आले. दरम्यान, दिवस-दिवस झाडावर बसून राहणे, रात्री अपरात्री शेतात निघून जाणे अशा विचित्र पद्धतीने तो वागू लागला. हा प्रकार समजल्यावर चिखलीतील विकास आश्रमाचे अध्यक्ष विकास साने आणि माऊली हरकळ यांनी त्याची जबाबदारी घेतली.

त्याला शिक्षण देण्याचे ठरविले. तो शाळेत जाऊ लागला. त्याच्यात अचानक बदल झाला. वर्गात त्याने दरवर्षी पहिला किंवा दुसरा क्रमांक मिळवत अभ्यासात चांगली प्रगती केली. त्याच्यात झालेल्या या बदलामुळे हाच तो मुलगा का, असा प्रश्‍न पडत आहे. विकास दत्तात्रेय नानोटे (वय ११, रा. आरडा, ता. मंठा, जि. जालना) याची ही कहाणी. काळोख्या रात्री अंधारात चाचपडत असताना काजवा प्रकाशून आधार वाटावा तसे विकासच्या जीवनात घडले.

विकास पाच वर्षांचा असतानाच एका आजाराने आईचे निधन झाले. त्यातून सावरत असतानाच काही दिवसांनी त्याचे वडील दत्तात्रेय यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यात त्यांना अपंगत्व आले. शेती असूनही ती पिकविण्यास माणूस नाही. दुसरे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही.

एकामागून एक संकट आल्यावर नातेवाइकांनी पाठ फिरवली. खाण्या-पिण्याचे हाल होऊ लागले. नियतीच्या फेऱ्यात अडकलेले हे कुटुंब पुरते कोलमडून पडले. पाटी पेन्सिल घेऊन शाळेत जाण्याच्या वयात पित्याचा सांभाळ करण्याची वेळ विकासवर आली. दरम्यान, कोणी लक्ष द्यायला नसल्याने विकासचा स्वभाव एकलकोंडा झाला. तो एकटाच दिवसभर भटकत राहायचा. दिवस दिवस चिंचा, आंबा, रामफळ, बोर, बाभूळ अशा झाडांवर तो बसून राहायचा. रात्री घरी आला तरी तो वाट दिसेल त्या दिशेने निघून जाई. त्याच्या विचित्र वागण्यापुढे वडिलांनी हात टेकले. हा प्रकार समजल्यावर चिखलीतील विकास अनाथाश्रमाचे विकास साने आणि माऊली हरकळ यांनी त्याची जबाबदारी घेतली. त्याला चिखलीत आणून शाळेत घातले. शाळेत जाताच त्याच्या वागण्या-बोलण्यात बदल झाला. त्याने सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित केले. त्याचे फळही त्याला मिळाले. तो दरवर्षी वर्गात पहिला किंवा दुसरा क्रमांक मिळवू लागला. विकास अनाथाश्रमामुळेच त्याच्या जीवनात आशेचा किरण दिसू लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com