लाखेवाडीच्या ओढ्यात पाणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

वालचंदनगर - लाखेवाडी (ता. इंदापूर) येथे सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून ओढा खोलीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सध्या पडलेल्या पावसामुळे ओढ्यात पाणी साचले आहे. ओढ्यातील पाण्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

वालचंदनगर - लाखेवाडी (ता. इंदापूर) येथे सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून ओढा खोलीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सध्या पडलेल्या पावसामुळे ओढ्यात पाणी साचले आहे. ओढ्यातील पाण्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

लाखेवाडीमध्ये ‘सकाळ’ रिलीफ फंड व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून ओढा खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या कामासाठी पुण्यातील उद्योजक विनायक वाळेकर यांनी ओढा खोलीकरणासाठी मोफत पोकलेन मशिन उपलब्ध करून दिली होती. २२४४ मीटर लांबी, ८.८ मीटर रुंदी व १.९३ खोलीमध्ये ओढा खोलीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. नुकत्याच गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे ओढ्यामधून वाहून जाणारे पावसाचे पाणी ओढ्यातील जमिनीमध्ये मुरले आहे. 

चालू वर्षी होणाऱ्या पावसाळ्यामध्ये जास्तीतजास्त पाणी ओढ्यामध्ये मुरणार असून, यामुळे लाखेवाडीमध्ये गावातील जलस्रोत बळकट होण्यास मोलाची  मदत होणार आहे. ओढ्यामध्ये  ३ कोटी ८१ लाख लिटर पाणीसाठा होणार आहे. ‘सकाळ’ने ओढा खोलीकरण केल्यामुळे लाखेवाडी गावातील व परिसरातील पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न उन्हाळ्यामध्ये कमी होण्यास मदत होणार आहे. काम पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी गणेश डोंगरे यांनी मदत केली.

‘सकाळ’चे आभार 
लाखेवाडी गावच्या ओढा खोलीकरण व रुंदीकरणाचा प्रश्‍न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. सकाळ माध्यम समूहाने ‘सकाळ’ रिलीफ फंडातून गावामध्ये ओढा खोलीकरण व रुंदीकरण केल्यामुळे गावातील परिसरातील जलस्रोत बळकट होण्यास मदत होणार असून, आम्ही ग्रामस्थांच्या वतीने ‘सकाळ’ माध्यम समूहाचे आभार मानत असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले व सरपंच सोमनाथ गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: walchandnagar Finished work done under Sakal Relief Fund