युवकांनी बनवली फोल्डेबल इलेक्‍ट्रीक टू व्हीलर

अमोल जाधव
गुरुवार, 23 मार्च 2017

शेऱ्यातील जॅकीसह चार युवकांची निर्मिती; बॅटरीवर चालणार, इंधनात होणार बचत

शेऱ्यातील जॅकीसह चार युवकांची निर्मिती; बॅटरीवर चालणार, इंधनात होणार बचत
रेठरे बुद्रुक - दिवसागणिक वाढत चाललेल्या डिझेल, पेट्रोलच्या दराने वाहनधारकांच्या खिशाला चांगलीच कात्री लावली जात आहे. यात वाहनधारकांना दिलासा मिळावा व त्यांची इंधन खर्चातून सुटका व्हावी, या हेतूने शेरे (ता. कऱ्हाड) येथील जॅकी जगदीश गुरव या युवकाने मित्रांच्या मदतीने फोल्डेबल इलेक्‍ट्रीक टू व्हीलर बनवली आहे. या बाईकला ‘जेओएसटी- १६’ हे नाव देण्यात आले आहे. जॅकी गुरव, ओंकार भंडारे, शुभम साळुंखे व तुषार भोसले यांनी ही बाईक तयार केली आहे. अनेक प्रकारच्या प्रदूषणामुळे सध्या जागतिक तापमान वाढत आहे. वायू व ध्वनी प्रदूषणामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्येवर विविध पातळ्यांवर उपाय शोधण्याचे काम सुरू आहे. प्रदूषण टाळण्यासाठी ध्वनी व वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी संशोधकांनी प्रयत्न सुरू ठेवलेत. जगभरात इंधनाचा साठा मर्यादित आहे. इंधनाचे दर प्रति दिन वाढत आहेत.

त्यामुळे इंधनाचे नवनवीन स्त्रोत शोधले जात आहेत. शिवाजी विद्यापीठामधील तंत्रज्ञान विभागातील अभियांत्रिकीच्या चौथ्या वर्षासाठी इनोव्हेटिक प्रोजेक्‍ट नावाचे प्रात्यक्षिक असते. त्यामध्ये जॅकी, ओंकार, शुभम व तुषार या विद्यार्थ्यांनी आगळीवेगळी गाडी तयार करण्याचे ठरवले.

त्यातून फोल्डेबल इलेक्‍ट्रीक टू व्हीलरची निर्मिती झाली. या गाडीला ‘जेओएसटी- १६’ असे नाव देण्यात आले आहे. ते म्हणजे ‘जे’ जॅकी, ‘ओ’ म्हणजे ओंकार, ‘एस’ म्हणजे शुभम आणि ‘टी’ म्हणजे तुषार असे संदर्भ आहेत. या गाडीची फीचर्स जबरदस्त आहेत. ५० किलो वजनाची गाडी ताशी ३० ते ३५ किलोमीटर वेगाने धावते. गाडीसाठी १२ व्होल्टच्या चार बॅटरी वापरण्यात आल्या आहेत. पाच तास चार्जिंग केल्यानंतर ही गाडी ६० किलोमीटर चालू शकते. गाडी बनविण्यासाठी १५ दिवस लागले. तर खर्च २५ हजार रुपये आला आहे. ही गाडी फोल्डिंगची असल्याने चारचाकीच्या डिग्गीतून इतरत्र घेवून जाता येते. गाडीचा आकार लहान असल्याने पार्किंगसाठी कमी जागा लागते. गाडी ६० किलोमीटर चालविण्यासाठी अवघा १५ रुपये खर्च येतो. मेंटनन्स फ्री असल्याने भविष्यातील खर्चातही बचत होते. या गाडीला प्रादेशिक परिवहन विभागाच्या परवान्याची गरज भासत नाही. या विद्यार्थ्यांना सहायक प्रा. ए. एस. जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. या गाडीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्यास इंधन व आर्थिक खर्चातही बचत होणार आहे.