आवळेगावात 86 बिऱ्हाडांचा एकत्र गणेशोत्सव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

चार बंधूंकडून मुहूर्तमेढ - ब्रिटिश काळापासून सुरू आहे परंपरा; जिल्ह्यात लौकिक

चार बंधूंकडून मुहूर्तमेढ - ब्रिटिश काळापासून सुरू आहे परंपरा; जिल्ह्यात लौकिक
कडावल - लोकमान्य टिळकानी सार्वजनिक गणेशोत्सवाची चळवळ सुरू केली. त्याच सुमारास आवळेगाव मधलीवाडी येथील चार बंधूनी आपल्या घराण्याचा एकत्रित श्री गणेशोत्सवाची मुहूर्त मेढ रोवली. कालांतराने हा उत्सव सोळा बिऱ्हाडांचा गणपती म्हणून नाव लौकिकास प्राप्त झाला. पूर्वीच्या सोळा बिऱ्हाडांची आजमितीस 86 कुटुंबे झाली आहेत; मात्र ब्रिटिश काळापासून चालत आलेली एकत्रित किंवा सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आजही अखंड पाळली जात आहे.

या सणाच्या अनुषंगाने एकीचा वारसा पूर्वीच्याच आत्मियतेने आणि आंतरिक भावनेने आजही पुढे चालवला जात आहे. नोकरी धंद्या निमित्ताने देशाच्या विविध भागासह परदेशातही स्थिरावलेले या घराण्याचे सदस्य श्री गणेश चतुर्थीला हमखास उपस्थित राहून जनमानसात एकीचा संदेश देत आहेत.

तरुणांमध्ये परस्पर विचारांचे आदान प्रदान होऊन त्यांच्यातील विधायक शक्तीचा देश कार्यासाठी उपयोग व्हावा, यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली होती. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळे उदयास येऊ लागली होती. आणि याच सुमारास आवळेगाव मधलीवाडी येथील सावंत घराण्यातील चार बंधूनी आपल्या घराण्याच्या एकत्रित गणेशोत्सवाचीही मुहूर्त मेढ रोवली. पुढच्या काळात सोळा बिऱ्हाडांचा गणपती म्हणून हा उत्सव प्रसिद्ध झाला.

सोळा बिऱ्हाडांचा गणपती असा या गणपतीचा नाव लौकिक असला, तरी पूर्वीच्या सोळा कुटुंबांची आता तब्बल 86 कुटुंबे झाली आहेत. सुमारे 350 माणसांचा गोतावळा आहे. या घरात पूर्वीपासून श्रींची स्थापना करण्यात येते. कुटुंबांचा वेल विस्तार वाढीस लागल्यानंतर जुन्या घरात जागा अपुरी पडू लागल्यामुळे गरज म्हणून अनेक सदस्यांनी वाडीत, गावात इतरत्र घरे बांधली आहेत. अनेक सदस्य नोकरी धंद्या निमित्ताने मुंबई, पुणे तसेच विविध भागात वास्तव्यास आहेत. काहीजण परदेशातही आहेत; मात्र ते कुठेही असले तरी श्री गणेश चतुर्थीला हमखास हजर राहतात. गेल्या कित्येक पिढ्यांपासून यात खंड पडलेला नाही. या वास्तूमध्ये श्री गणेश चतुर्थी प्रमाणेच नागपंचमी, गुढी पाडवा तसेच इतर महत्त्वाचे सणही साजरे केले जातात.

कित्येक पिढ्यांपासून पाटही तोच
सध्या या घराण्याच्या जाणतेपणाची धुरा यशवंत धाकू सावंत हे सांभाळत आहेत. घराण्याच्या परंपरेप्रमाणे अग्र पूजेचा मान जाणत्या व्यक्तीला दिला जातो.

सावंत घराण्याच्या आवळेगाव मधलीवाडी येथील घराच्या वळयला वाडीत थोरल्या वळयचा मान दिला आहे. या वळयला थोरली वळय असेच म्हटले जाते. पूर्वापारपासून या वळयमध्येच श्रीची स्थापना करण्यात येते. ज्या पाटावर श्री विराजमान होतात तो पाटही पूर्वीचाच आहे. कित्येक पिढ्यांपासून श्रींचा पाट बदलण्यात आलेला नाही. तसेच भजन मंडळही या एकाच घराण्याचे असून हे मंडळच श्रींची आरती तसेच भजने करते.

Web Title: kadaval konkan news common ganeshotsav in 86 family