मनोरुग्णालयात गणेशमूर्ती साकारण्याचा मानसोपचार

मनोरुग्णालयात गणेशमूर्ती साकारण्याचा मानसोपचार

रत्नागिरी - येथील मनोरुग्णालयातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी गणेशमूर्ती बनविण्यात त्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. रुग्णालयाच्या इतिहासात असा प्रयोग प्रथमच केला. ६ महिला व ५ ते ६ पुरुष रुग्णांनी गेल्या दीड महिन्यात ११ गणेशमूर्ती बनवल्या आहेत. व्यवसाय उपचार विभागातर्फे हा उपक्रम करण्यात आला. इतर कामकाजापेक्षा मूर्ती करण्यात रुग्ण लवकर राजी झाले व त्यांच्यावर परिणामही लवकर झाला.

गोगटे महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. बिना कळंबटे विद्यार्थ्यांद्वारे व्यवसाय उपचारपद्धतीत सहभाग घेतात. यावर्षी प्रथमच गणपती बनवणारा मानसशास्त्राचा विद्यार्थी सिद्धेश लाड याने रुग्णांना ‘गणपती’ शिकवण्याची तयारी दाखवली व रुग्णालयानेही ती मान्य केली.

सिद्धेश म्हणाला, ‘‘सुरवातीला त्यांना माती मळायला, त्यानंतर साचा भरायला व अंगाचे रंगकाम करायला दिले. दोन रुग्णांना एका गणपतीचे काम दिले होते, ते त्यात छान रमत. रेखणीचे काम मात्र त्याने स्वतः केले. ११ पैकी ३ मूर्तींची विक्री झाली आहे. यापैकी दोन रुग्णांनी हे काम पूर्वी केल्याचे आठवते, असे सांगितले. शहरातील सावंत पेंटर, साळुंखे पेंटर व बारके पेंटर यांचे साह्य मिळाले.’’ सावंत यांचे विशेष मार्गदर्शन होते. या तिघांनीही साचे आवर्जून दिले.

भास, भ्रम, चिडचिड, आक्रमक होणे अशा विविध लक्षणांवर व्यवसाय उपचार केले जातात. ही लक्षणे कमी होण्यासाठी व त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जेला वाट देण्यासाठी रुग्णांना गुंतवून ठेवणारे काही व्यावसायिक काम दिले जाते. सृजनशील काम असेल, तर त्याचा अधिक उपयोग होतो. कामात गुंतल्यानंतर रुग्णात सकारात्मक बदल होतात.

यावेळी लक्षणांनुसार वेगळे काम देण्याऐवजी गणेशमूर्ती बनवण्यास साऱ्यांनाच सांगितले. इतर वस्तू बनवताना रुग्ण त्यामध्ये तल्लीन होण्यास दीर्घ कालावधी लागतो, मात्र यामध्ये वेगळा अनुभव आला. गणपती बनवण्यास सारे तत्काळ तयार झाले. व्यवसाय उपचारतज्ज्ञ डॉ. कृणाल देसाई, त्यांचे सहकारी संकेत पावसकर, प्रतिमा मजगावकर या साऱ्यांनी डॉ. विलास भैलुमे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले.

गणेशमूर्ती बनवण्याचे काम प्रथमच झाले. सिद्धेशसारखे आणखी विद्यार्थी इतर कामात रुग्णांना शिकवतात, मदत करतात. महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागामार्फत अशा प्रयोगात पुढाकार घेतला जातो. विद्यार्थ्यांच्या जाणिवा वाढवण्यासाठी हे केले जाते.
- प्रा. बिना कळंबटे

गणेशमूर्तीत रुग्ण लवकर इन्व्हॉल झाले. एक महिला अत्यंत संदर्भहीन अखंड बडबड करत असे, मात्र या उपचाराद्वारे ती शांत झाली आहे. बोलणे कमी झाले नाही, मात्र त्यात सुसूत्रता आली आहे. इतर वस्तूंपेक्षा गणेशमूर्तीबाबत वेगाने उपचार झाले.
- डॉ. कृणाल देसाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com