देवरुखातील पहिल्या मानाच्या गणपतींचे आगमन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

साडवली - कोकणातील पहिला सुरू होणारा गणेशोत्सव अशी ख्याती असलेला देवरुख वरची आळी सिद्धिविनायक मंदिरातील घोड्यावर आरूढ गणेशमूर्तीचे आज प्रतिपदेला सवाद्य मिरवणुकीने आगमन झाले. रिद्धी-सिद्धी, भालदार चोपदार यांच्यासह उत्सवमूर्ती मंदिरात विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

सकाळी ग्रामदेवता सोळजाईला निमंत्रण देऊन भोंदे गणेशचित्र शाळेतून ही मानाची गणेशमूर्ती सवाद्य मिरवणुकीने मंदिरात नेण्यात आली. मोरया मोरयाच्या गजरात शिवाजी चौक, बाजारपेठ, माणिक चौकातून ही मिरवणूक सिद्धिविनायक मंदिरात नेण्यात आली. मंदिरात द्वारपूजन, नृत्य, माध्यान्ह पूजा, आरती, प्रसाद, भाविकांची सहस्रवर्तने करण्यात आली. प्रतिपदेपासून हा उत्सव सुरू झाला. प्रतिपदेला देवरूखमधील श्रीकांत जोशी यांच्या निवासस्थानी घरगुती पहिली गणेशमूर्ती स्थानापन्न झाल्यानंतर सिद्धिविनायक मंदिरातही मानाची पहिली मूर्ती विराजमान झाली.

मोरगावच्या गणेशोत्सवाप्रमाणेच येथील गणेशोत्सव सुरू झाला आहे. चतुर्थीला घरगुती, सार्वजनिक गणेशमूर्तींचे आगमन होणार असून, बाप्पाच्या उत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होऊ लागल्याने देवरूख बाजारपेठेत सजावट सामानाची खरेदीची झुंबड उडाली आहे.