वेंगुर्लेची देवी सातेरी

वेंगुर्लेची देवी सातेरी

ग्रामदेवता असलेल्या श्री देवी सातेरी समोर प्रत्येक वेंगुर्लेवासीय भक्तीभावनेने नतमस्तक होतो. सातेरीचे मंदिर या शहराचे वैभव आहे. सुमारे ५०० वर्षांपूर्वीचे हे मंदिर प्रशस्त आवारात आहे. ५० फुट रुंद व १५० फूट लांबीचे संपूर्ण जांभ्या दगडाने ते बनविण्यात आले आहे. प्राचीन वास्तुस्थापत्य शास्त्राचा अजोड नमुना म्हणून प्रसिद्ध असलेले ४ ते ५ फूट रुंदीच्या भिंतीवर पूर्णपणे दगडी कमानींवर व जुन्या घाटणीच्या; पण वैशिष्ट्यपूर्ण बांधकामावर उभे आहे.

दरवाजा सोडल्यास लाकडाचा वापर न करता बांधलेले पूर्ण दगडी मंदिर म्हणून कुतूहलाने मंदिराकडे पाहिले जाते. बांधकामात उठून दिसणारा माडीचा भाग व त्यामागे मंदिराच्या सौंदर्यात वाढ करणारा गोल घुमटाकार कळस आहे. मंदिराच्या सौंदर्याला साजेशी सुबक दगडी दीपमाळा व तुळशी वृंदावन खास आकर्षण आहे.

वेंगुर्ले हे नाव या नगरीस पडण्यास कारण अशी एक कथा या भागात प्रचलित आहे. त्या कथेचा संबंध श्री देवी सातेरीशी आहे. श्री देवी सातेरी ही मुळ अणसूर या गावची. वेंगुर्लेपासून ६ मैलावरचे हे गाव. त्याकाळी सुभ्याचे प्रमुख गाव म्हणून प्रसिद्ध होते. वेंगुर्ले हे शहर त्याकाळी अस्तित्वात नव्हते. अणसूर या गावात श्री देवी सातेरीचे मंदिर आहे. आज त्या मंदिरास मुळ भुमिकेचे मंदिर असे म्हटले जाते. त्या मंदिराचे परब व गावडे हे दोन प्रमुख मानकरी आहेत. त्याकाळातील परब कुळातील एक पुरुष (सध्याच्या वेंगुर्लेच्या परब कुळाचा मुळपुरुष) नित्यनेमाने वेंगुर्लेहून ६ मैल चालत अणसूर येथे जाऊन श्री देवीची पूजा-अर्चा करीत असे.

पुढे वृद्धापकाळाने चालत जाणे अशक्‍य होऊ लागल्याने त्याने देवीची मनोभावे करुणा भाकली. श्री देवीच्या दर्शनाची व्याकुळता व उत्कट निस्सीम भक्तीमुळे त्या पुण्यपुरुषास एके दिवशी दृष्टांत झाला. देवीने प्रसन्न होऊन सांगितले की, मी तुझ्याजवळ येईन. तुझ्या गाईने ज्या ठिकाणी पान्हा सोडलेला असेल त्या जागी मी आहे. त्या दृष्टान्ताप्रमाणे शोध घेता त्याला गायीने पान्हा सोडलेल्या पाषाणावर मातीचे वारुळ झरझर वाढत आहे, असे दृष्य दिसले. ते पाहून त्या पुण्यपुरुषाने अति उत्कट भक्तीभावाने त्या वारुळास मिठी मारली व सांगितले, आई आता तू येथेच थांब. त्याबरोबर वारुळाची वाढ थांबली.

मिठी म्हणजे वेंग हा शब्द त्याकाळी प्रचलीत होता. वारुळ वेंग मारुन उरले यावरुनच वेंग मारुन उरले ते वेंगुर्ले, असे या नगरीचे नामकरण झाले. श्री देवी सातेरी वारुळाच्या रुपाने प्रगट झाल्यावर कालांतराने तिला एक आकार देऊन मुखवटा तयार केला गेला. श्री देवी सातेरी मंदिरात असलेल्या मूर्तीखाली ते स्वयंभू पाषाण आहे. दर तीन - चार वर्षांनी मूर्ती बदलून पुन: प्राणप्रतिष्ठापना करण्यात येते त्याला मळलेपन कार्य असे म्हणतात. देवीच्या जागृकतेचा पडताळा आजही असंख्य लोकांना येतो. नवरात्रीत नारळ, तांदुळाची ओटी भरणारा गरीब व सोन्या चांदीच्या वस्तू अर्पण करणारा धनवान दोघेही एकाच भक्तीभावाने देवीसमोर नतमस्तक होताना दिसतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com