सांगवेची श्री दिर्बादेवी

तुषार सावंत
रविवार, 24 सप्टेंबर 2017

जागर नवरात्रोत्सवाचा...

सांगवे व भिरवंडे या दोन गावांतील जागृत देवस्थान म्हणजे सांगवे येथील श्री दिर्बादेवी होय. भक्तांच्या, माहेरवाशिणींच्या हाकेला धावणारी देवी अशी या देवस्थानविषयी भाविकांची श्रद्धा आहे.

सांगवे व भिरवंडे या दोन गावांतील जागृत देवस्थान म्हणजे सांगवे येथील श्री दिर्बादेवी होय. भक्तांच्या, माहेरवाशिणींच्या हाकेला धावणारी देवी अशी या देवस्थानविषयी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होतात. नवरात्रोत्सवातील उत्सवानिमित्त घटस्थापनेच्या आदल्या दिवशी दोन्ही गावांतील मानकरी आणि ग्रामस्थ दिर्बादेवी मंदिरात एकत्र येतात. त्यानंतर लिंगेश्वर, गांगो, महालक्ष्मी, भावई या देवतांबरोबरच दिर्बादेवीच्या मंदिरात विधिवत घटस्थापना होते. 

चव्हाटा मंदिरातही घटस्थापना केली जाते. त्यानंतर विजयादक्षमी म्हणजे दसऱ्यापासून वार्षिक जत्रोत्सवाला सुरवात होते. माहेरवशीनीच्या हाकेला धावणारी देवी अशी ख्याती या देवीची आहे. गावकरी, पाहुणेमंडळींची अढळ श्रद्धा या देवस्थानवर आहे. घटस्थापनेनंतर नवव्यारात्री नवस आणि साड्या देवीला मानवल्या जातात, तरंग साड्यांनी सजविले जातात. दुसऱ्या दिवशी देवाचे विधीवत विवाह होतात. सोने लुटण्याच्या त्या दिवशीचे खास आकर्षण असते.

सांगवे-भिरवंडे या दोन गावातील मंडळी देशविदेशात चाकरीसाठी आहेत. त्यांना सुखी ठेवण्याचे मनोमन मागणेही मागतात. देवीकडे साड्या मानवण्याचा अर्थात नवस फेडण्याचा कार्यक्रम दसऱ्यापासून सात दिवस होतो. माहेरवासिणी यावेळी खणानारळाची ओटीभरून देवीचे दर्शन घेतात. दसऱ्यानंतर शिवकळेचा कार्यक्रम सुरू असतो. आपली गाऱ्हाणी देवासमोर मांडण्यासाठी दूरवरून येत असतात. दिर्बादेवीच्या वार्षिक जत्रोत्सवात शेकडो साड्या, सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम नवस फेडण्याच्या माध्यमातून भक्तगण देवीला अर्पण करतात.