१५ हजार लोकांना टंचाईची झळ

१५ हजार लोकांना टंचाईची झळ

७८ गावांतील १३५ वाड्या तहानलेल्या; प्रशासनाची उडालीय तारांबळ

रत्नागिरी - कडाक्‍याच्या उन्हामुळे भूगर्भातील पाणीसाठा दिवसेंदिवस घटत चालला आहे. त्याच्या परिणामी टंचाई वाढत आहे. जिल्ह्यातील ७८ गावांतील १३५ वाड्यांमधील १५ हजार लोकसंख्येला झळ बसली आहे.

त्यामुळे १७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. गतवर्षी ७१ गावांतील १२२ वाड्यांमध्ये टॅंकर सुरू होता. तुलनेत यावर्षी उन्हाचा कडाका सर्वाधिक असल्याने टंचाई अधिक आहे. पाऊस लवकर दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तो फोल ठरला तर टंचाईची तीव्रता वाढणार आहे.

मे महिन्यात पारा ३४ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत स्थिर राहिला आहे. त्यामुळे हवेतील उष्मा वाढलेला आहे. धरणे, बंधारे विहिरींमधील पाण्याची पातळी खालावत आहे. नद्या, नाले कोरडे पडले आहेत. भूगर्भातील पाणी पातळी कमी झाल्याने विंधन विहिरींचा पर्याय काही ठिकाणी उपयुक्‍त ठरत नाही. २७ विंधन विहिरींना पाणीच लागलेले नाही. परिणामी टॅंकरचा एकमेव पर्याय वापरला जात आहे. 

त्यामुळे टॅंकरला मागणीही वाढत आहे. १३५ वाड्यांना १७ टॅंकरने पाणीपूरवठा करत असताना प्रशासनाची तारांबळ उडत आहे. सर्वाधिक टंचाई खेड तालुक्‍यात जाणवते. त्यापाठोपाठ संगमेश्‍वर, चिपळूण तालुक्‍यांचा समावेश आहे. खेडसाठी अवघे ६ टॅंकरच आहेत. पाणीपुरवठा करताना नियोजन केले आहे. दोन दिवसांआड पाणी त्या-त्या वाड्यांना दिले जाते. त्यासाठी काही विहिरीही अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. राजापूर तालुका आजही टॅंकरमुुक्‍त आहे.

हवामान विभागाकडील माहितीनुसार मॉन्सून अंदमान, बंगालच्या उपसागरापर्यंत येऊन ठेपला आहे. त्याची पुढील वाटचाल वेगात झाली, तर केरळमध्ये १ जूनपर्यंत दाखल होईल. त्यानंतर पुढे ७ जूनपर्यंत कोकणात सक्रिय होऊ शकतो. हे गणित जमले तर टंचाईच्या झळांपासून पंधरा हजार लोकांची सुटका होईल. अन्यथा पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. धरणावर अवलंबून असलेल्या नळ-पाणी योजनांचीही स्थिती गंभीर बनणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com