खेडमधील 22 परमिट रूमना टाळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

महामार्गालगतची दारूची दुकाने बंद करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आज खेड तालुक्‍यातील एक वाइन शॉप, 22 परमिट रूम, 6 बीअर शॉपी व 5 देशी दारू दुकाने उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी सील केली. ही कारवाई सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. खेड तालुक्‍याच्या हद्दीतील धामणंद येथील एक बीअर शॉपी आणि धामणदेवी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एक बार या कारवाईतून बचावले.

खेड - महामार्गालगतची दारूची दुकाने बंद करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आज खेड तालुक्‍यातील एक वाइन शॉप, 22 परमिट रूम, 6 बीअर शॉपी व 5 देशी दारू दुकाने उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी सील केली. ही कारवाई सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. खेड तालुक्‍याच्या हद्दीतील धामणंद येथील एक बीअर शॉपी आणि धामणदेवी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एक बार या कारवाईतून बचावले.

महामार्गावर दारू पिऊन होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी महामार्ग व राज्य मार्गापासून 500 मीटरवर असलेली दारू विक्रीची दुकाने, परमिट रूम, देशी दारू विक्री केंद्र, बीअर शॉपी 1 एप्रिल 2017 पासून बंद करण्यात यावीत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाला स्थगिती मिळण्यासाठी मद्यविक्रेते, बार मालक, बीअर शॉपी ओनर्स यांनी प्रयत्न केले; परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश न आल्याने आज अखेर उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी महामार्गापासून 500 मीटरच्या आत असलेली मद्याची दुकाने सील करण्यास सुरवात केली.

महामार्गावरील भरणे नाका परिसरातील हॉटेल पूनम, हॉटेल सरस्वती, हॉटेल साई रिसॉर्ट, हॉटेल सन्मान, हॉटेल अभिरुची, वेरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हॉटेल गणपती कृपा, हॉटेल श्री स्वामी, खेड शहरातील सुवर्णा वाइन्स हे मद्यविक्रीचे एकमेव दुकान, गांधी चौक येथील हॉटेल न्यू प्रभात, हॉटेल रूपाली, हॉटेल विजय, हॉटेल सवेरा, हॉटेल इंद्रप्रस्थ, लोटे औद्योगिक वसाहतीतील हॉटेल ओमेगा इन, हॉटेल जानकी, हॉटेल वक्रतुंड, हॉटेल दरबार, हॉटेल पॅगोडा, हॉटेल आनंदी, हॉटेल सदिच्छा, बोरज ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल सेन्चुरी व सुरभी गार्डन हे बीअर बार सील करण्यात आल्याचे उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

भरणे नाका येथील चाळके बीअर शॉपी, एसएनएस बीअर शॉपी, सन्मान बीअर शॉपी, हॅपी बीअर शॉपी, खेड शहरातील सई बीअर शॉपी, लोटे येथील देवळेकर बीअर शॉपी, त्याचबरोबर भरणे नाका येथील नवरंग देशी बार, वेरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पिंपरे देशी बार, तसेच खेड शहरातील तोडणकर व खामकर देशी बार व लोटे येथील पटवर्धन देशी बार ही मद्यविक्रीची दुकाने सील करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: 22 permit rooms sealed