रत्नागिरीच्या ३१ शिक्षकांचे स्वप्न भंगले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

रत्नागिरी - अतिरिक्‍त शिक्षक आणि समायोजन प्रक्रियेचे कारण देत उस्मानाबाद जिल्हा परिषदेने रत्नागिरीतील ३१ प्राथमिक शिक्षकांचे जिल्हा बदलीचे प्रस्ताव नाकारले आहेत. ना हरकत प्रमाणपत्रालाच नकारघंटा मिळाल्याने स्वगृही जाणाऱ्या त्या शिक्षकांचे स्वप्न भंगले आहे. आपसी बदलीचे दोन प्रस्ताव मान्य करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून सांगण्यात आली.

शासकीय नियमानुसार पाच वर्षे झाल्यानंतर या शिक्षकांना स्वगृही जाण्याचे वेध लागतात. हरतऱ्हेचे प्रयत्न करून शिक्षक स्वतःच्या जिल्ह्यात किंवा जवळच्या जिल्ह्यात बदली करून घेण्यासाठी धडपडीला लागतात. दरवर्षी शेकडो प्राथमिक शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त होत आहेत. यावर्षी जिल्ह्यातील आठशेहून अधिक प्रस्ताव आले होते. छाननी केल्यानंतर ते प्रस्ताव संबंधित जिल्हा परिषदेकडे ना हरकतीसाठी पाठविण्यात येतात. या प्रक्रियेत पारदर्शकता आणि अर्थपूर्ण व्यवहारचा आक्षेप कोणी घेऊ नये, यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेकडे ३१ शिक्षकांचे प्रस्ताव जिल्हा बदलीसाठी गेले होते. तेथील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रस्ताव नाकारले आहेत.

उस्मानबाद जिल्हा परिषदेमधील शिक्षकांची समायोजन प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. तेथे अतिरिक्‍त प्राथमिक शिक्षकांची संख्या अधिक आहे. जोपर्यंत समायोजन प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत जिल्हा बदलीने येणाऱ्यांना सामावून घेता येणार नाही. हे पत्र नुकतेच रत्नागिरीच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाले आहे. पती-पत्नी एकत्रीतच्या आपसी बदलीमध्ये बसणारे दोन शिक्षकांच्या प्रस्तावांना हिरवा कंदील दिला आहे.

उर्वरित सगळे प्रस्ताव परत पाठविले आहेत. तांत्रिक अडचणींमुळे या ३१ शिक्षकांचे स्वतःच्या घराजवळ जाण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. यावर्षीचा त्यांचा प्रयत्न फसला असून आता पुन्हा पुढील वर्षी प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. यावेळी केलेले सर्वप्रकारचे प्रयत्न वाया जाणार आहेत.

Web Title: 31 teacher dream colapse