सह्याद्री राज्यमार्गासाठी साडेतीन कोटी

शिवापूर - दुर्गम शिवापूर गाव सह्याद्री रस्त्यामुळे नव्या मार्गाने जोडले जाणार आहे.
शिवापूर - दुर्गम शिवापूर गाव सह्याद्री रस्त्यामुळे नव्या मार्गाने जोडले जाणार आहे.

काम लवकरच सुरू - १११ कि.मी. नव्या रस्त्याने दुर्गम गावे आणणार मुख्य प्रवाहात

सावंतवाडी - सह्याद्री पट्ट्यातील गावांच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या सह्याद्री राज्यमार्गासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. १११ किलोमीटर लांबी असलेल्या या रस्त्याचा विकास झाल्यास कनेडी-शिवापूर ते बांदा या परिसरात येणाऱ्या पंधराहून अधिक गावांना त्याचा लाभ होणार आहे. लवकरात लवकर हे काम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती बांधकाम विभागाच्या अधिकारी अनामिका चव्हाण यांनी दिली. 

बांधकाम विभागातर्फे मार्चअखेरपर्यंत झालेल्या कामांचा आढावा घेतला असता सौ. चव्हाण यांनी ही माहिती दिली. यात नाबार्ड, पंचवीस पंधरा, जिल्हा नियोजन अशा अनेक निधीतून तालुक्‍यातील सुमारे साडेआठ कोटींची कामे ९० टक्के पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. 

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या वर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी आला. यातील बराचसा निधी प्रमुख राज्यमार्ग, जिल्हा मार्ग आणि ग्रामीण मार्ग यासाठी खर्च केला आहे. विशेष म्हणजे सह्याद्री पट्ट्यातील गावांच्या विकासासाठी दुवा ठरणाऱ्या सह्याद्री राज्यमार्गासाठी साडेतीन कोटी मंजूर केले आहेत. या निधीच्या माध्यमातून प्रस्तावित रस्त्याचे डांबरीकरण, खडीकरण आदी कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. सद्यःस्थिती लक्षात घेता या रस्त्याची रुंदी वाढविण्याबाबत कोणतेही नियोजन नाही. यामुळे भूसंपादन प्रक्रिया आणि अन्य गोष्टीबाबत तूर्तास तरी कोणताही निर्णय झालेला नाही. या स्थितीत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. 

मार्च अखेरीस प्राप्त झालेल्या साडेआठ कोटींच्या निधीतून अनेक कामे मार्गी लागली आहेत. यात आमदार फंड पन्नास टक्के पूर्ण खर्च झाला आहे. पंचवीस-पंधरा हेडखाली बरीचशी कामे पूर्ण झालेली आहेत. नियोजनमधील कामांचा पूर्ण झालेल्या कामात समावेश आहे. दरम्यान, या सर्व विकासकामांत अनेक वर्षे रेंगाळलेल्या रस्त्यांचा प्रश्‍न सुटला आहे. यात आंबोली-चौकुळ, शेर्ले- निगुडे, बांदा-शेर्ला डोनकल, निरवडे-न्हावेली, बांदा-दाणोली, माडखोल-कारिवडे, नेमळे-बादेवाडी तळवडे या रस्त्यांचा समावेश आहे,

तर जिल्ह्यातील सह्याद्री पट्ट्यातील गावांच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या सह्याद्री मार्गाला सुमारे साडेतीन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यांचे काम येत्या काळात सुरू करण्यात येणार आहे, असे सौ. चव्हाण यांनी सांगितले. 

या गावांना लाभ
हा रस्ता झाल्यानंतर कनेडी कुपवडे, कडावल, नेरूर, वाडोस, शिवापूर, शिरशिंगे, कलंबिस्त, वेर्ले, सांगेली, धवडकी, दाणोली, ओटवणे, विलवडे, बांदा ही बरीचशी डोंगराळ भागात असलेली गावे जवळ येण्यास मदत होणार आहे. यात ग्रामीण भागात जाणारे रस्ते सुसज्ज झाल्यामुळे त्याचा फायदा आपसुकच परिसरातील लोकांना मिळाला आहे, असा विश्‍वास सौ. चव्हाण यांनी बांधकाम विभागातर्फे व्यक्त केला.

पुलांचा प्रश्‍न मार्गी 
अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या नेमळे- बादेवाडी येथील पुलासोबत वाफोली निमजगा या पुलांचे काम घेण्यात आले आहे, तर भूसंपादनाच्या प्रक्रियेमुळे वादग्रस्त ठरलेल्या तळवणे पुलाला २ कोटी ३८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तीनही पुलांची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे, असे सौ. चव्हाण यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com