किनारा सुरक्षा साहित्यासाठी हवेत 50 लाख 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

रत्नागिरी - तिवरे (सिंधुदुर्ग) किनाऱ्यावरील दुर्घटनेनंतर जाग्या झालेल्या प्रशासनाकडून रत्नागिरी जिल्ह्यातील सोळा किनाऱ्यावर सुरक्षेची साधने उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलली आहेत. लाईफ जॅकेटस्‌, वॉच टॉवर, अत्याधुनिक दुचाकी यांसह विविध साधने खरेदीचा 50 लाखांचा प्रस्ताव तयार केला आहे. येत्या दोन दिवसांत तो शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. तेरा किनाऱ्यांवर जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. गणपतीपुळे, भाट्ये येथे जादा गर्दी असल्याने तेथे दोन अधिक जीवरक्षकांची नियुक्‍ती केली आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश किनाऱ्यांवर पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. येथील किनारे विस्तीर्ण असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुरेसे साहित्य ठेवणेही गरजेचे आहे. गणपतीपुळे, भाट्ये येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तेथे जीवरक्षक किंवा अन्य अत्याधुनिक साहित्यांची आवश्‍यकता आहे. त्याचा विचार करून जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी किनारा सुरक्षेचा आढावा घेतला होता. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या आदेशानुसार किनाऱ्यांच्या सुरक्षेचा लेखा-जोखाही घेण्यात आला. त्यामध्ये बहुतांश किनाऱ्यांवर पुरेसे साहित्य नसल्याचे दिसून आले. तेरा किनाऱ्यांवर जीवरक्षक आहेत, थोड्याप्रमाणात लाईफ जॅकेटस्‌ही आहेत. परंतु, स्विमिंग झोन निश्‍चित केलेले नाहीत, पर्यटक रात्री जात नसल्याने काही किनाऱ्यांवर विजेची व्यवस्था नाही, काही ठिकाणी सायरनही नाहीत. 

जिल्हा प्रशासनाने सोळा किनाऱ्यांवर आवश्‍यक साहित्यांसाठी प्रस्ताव तयार केला आहे. त्यात भाट्ये, गणपतीपुळे, गावखडी, भंडारपुळे, मालगुंड, वेळणेश्‍वर, हर्णे, मुरूड, दाभोळ, माडबन, जैतापूर, मुसाकाजी, लाडघर, आरे, कर्दे यांचा समावेश आहे. तेथे सहाशे लाईफ जॅकेटस्‌, चार वॉचटॉवर, दहा लाईफ बोये, मेगा फोन, रोप, सायरन, पंधरा रेस्क्‍यू सर्फ बोर्ड, 32 रेस्क्‍यू ट्यूब, सोळ वॉच चेअर, शंभर सुरक्षा माहिती देणारे फलक यासह गणपतीपुळे किनाऱ्यावर जमीन व पाण्यावर चालणारी अत्याधुनिक दुचाकी यांचा समावेश आहे. यासाठी सुमारे 50 लाख रुपयांचा निधी लागणार आहे. 

किनाऱ्यांवरील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवश्‍यक साहित्य मागवण्यात येणार आहे. त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल. तो मंजूर झाल्यानंतर त्वरित सोळा किनाऱ्यांवर हे साहित्य पुरविले जाईल. 
- लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद 

Web Title: 50 million for coastal safety material