जिल्ह्यात 563565 मतदार 

voter
voter

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी आज जाहीर झाली. या यादीनुसार जिल्ह्यात 5 लाख 63 हजार 565 मतदार आहेत. येत्या 21 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत 822 केंद्रांवर मतदान प्रक्रिया होईल. त्यासाठी 4600 कर्मचारी उपलब्ध असतील. त्यामध्ये आठ निवडणूक निर्णय अधिकारी व आठ सहायक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज सादर करावयाचा आहे. त्यांची प्रिंट साक्षांकित करून अंतिम मुदतीच्या दिवशी 6 फेब्रुवारीला दुपारी तीनपर्यंत सादर करावयाची आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज येथे दिली. 

या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण खाडे, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर उपस्थित होते. श्री. चौधरी म्हणाले, ""जिल्हा परिषद व आठही पंचायत समित्यांच्या निवडणुका शांततेत होण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. गत निवडणुकीत मतदानासंदर्भातील गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडून मागविली आहे. सरासरी टक्केवारीच्या तुलनेत खूपच कमी मतदान असणे व यासह अन्य प्रकारची माहिती घेऊन संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदार केंद्रे निश्‍चित केली जाणार आहेत. अशा केंद्रांवर अतिरिक्त पोलिस फौजफाटा तसेच सीसीटिव्ही कॅमेरे बसवून शांत पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.'' 

तहसीलदार संबंधित तालुक्‍याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असतील. वैभववाडीसाठी उपजिल्हाधिकारी डॉ. दीपा भोसले, देवगडसाठी मुंबई उपनगरचे अपर निवासी उपजिल्हाधिकारी श्‍याम घोलप, कणकवलीसाठी उपविभागीय अधिकारी नीता सावंत, कुडाळसाठी उपविभागीय अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी, मालवणसाठी भांडूप (मुंबई) येथील उपजिल्हाधिकारी उपेंद्र तामोरे, सावंतवाडीसाठी उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, वेंगुर्लेसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी नितीन राऊत, दोडामार्गसाठी मुलुंड उपजिल्हाधिकारी प्रमोद साळवे काम पाहतील. 

मतदारांची संख्या 13 जानेवारीच्या प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यात 5 लाख 63 हजार 565 मतदार आहेत. अंतिम मतदार यादी 21 जानेवारीला निश्‍चित होणार आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 5 जानेवारीच्या प्रारूप मतदार यादीत नाव आहे; परंतु त्यांच्या नावात व पत्त्यामध्ये बदल आहे अशा मतदारांनी आपल्या तक्रारी 12 ते 17 जानेवारी या काळात तहसीलदारांकडे नोंदवाव्यात. 17 ते 21 जानेवारीदरम्यान आलेल्या तक्रारींची छाननी करून 21 जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

जिल्ह्यात 913 मतदान केंद्रे असून शहरी भागातील केंद्रे वगळता ग्रामीण भागात 822 केंद्रे आहेत. गट आणि गण अशा दोन्हींमधील उमेदवारांसाठी ग्रामीण भागातील मतदारांना मतदान करावे लागणार आहे. 

अर्ज ऑनलाइनच 
इच्छुकांनी अर्ज केवळ ऑनलाइन प्रणालीवर भरण्याचे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील महा-ई सेवा, सायबर कॅफे, कॉमन सर्व्हिस सेंटरवरून सेवा उपलब्ध आहे. उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे शपथपत्रे व आवश्‍यक कागदपत्रे महाऑनलाइनने तयार केलेल्या सॉफ्टवेअर प्रणालीच्या मदतीने http:\\Panchayatelection.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरता येणार आहेत. 1 ते 6 फेब्रुवारी यादरम्यान 24 तास केव्हाही अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. 

मतदार यादीत दुरुस्ती शक्‍य 
विधानसभेच्या मतदार यादीत नवीन मतदारांच्या समावेशासाठी 21 ऑक्‍टोबर 2016 पर्यंत अर्ज केलेल्या व त्यातील आयोगाने मंजूर केलेल्या नावांचाच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या मतदार यादीत समावेश असेल. विधानसभेच्या मुळ मतदार यादीत कोणत्याही दुरुस्त्या होणार नाहीत. प्रभागनिहाय विभाजन करतांना झालेल्या चुकाच फक्त दुरुस्त करता येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com