रस्त्यासाठी ७५ हजार मोबदला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

कणकवली - हळवल येथील उड्डाणपुलाच्या जोडरस्त्यासाठी ११६ गुंठे जागा संपादित केली जाणार आहे. वाटाघाटीच्या प्रक्रियेने ही जमीन ग्रामस्थांनी शासनाच्या ताब्यात दिल्यास प्रतिगुंठा ७५ हजार १३२ एवढा मोबदला दिला जाणार आहे. तर भूसंपादन प्रक्रियेने ही जमीन ताब्यात घेतल्यास ६६ हजार रुपये प्रतिगुंठा असा दर मिळणार आहे. हळवल ग्रामस्थांनी मात्र प्रतिगुंठा दीड लाख दर मिळावा यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. या संदर्भात आज शासकीय विश्रामगृहात प्रांताधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी आणि हळवल ग्रामस्थ यांच्यात बैठक झाली. मात्र चर्चेत कोणताही निर्णय होऊ शकला नाही.

कणकवली-हळवल रस्त्यावरील हळवल येथे रेल्वे उड्डाणपुलाचे काम पाच वर्षांपूर्वीच पूर्ण झाले आहे, मात्र जोड रस्त्याची जागा शासनाने ताब्यात न घेतल्याने या मार्गावरून अद्याप वाहतूक सुरू झालेली नाही. शासनाने जोड रस्त्यासाठी तातडीने भूसंपादन करावे आणि उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करावी या मागणीसाठी सातत्याने आंदोलने होत आहेत. त्याअनुषंगाने भूसंपादन विभागाने हळवल उड्डाण पुलाच्या जोड रस्त्यासाठी आवश्‍यक त्या क्षेत्राची भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. यात आवश्‍यक त्या क्षेत्राची संयुक्‍त मोजणी पूर्ण झाली आहे. 

हळवल उड्डाणपुलाच्या जोडरस्त्यासाठी ११६ गुंठे जागा आवश्‍यक आहे. या जागेत ५८ खातेदार आहेत. या सर्वांनी वाटाघाटीने ही जागा शासनाला द्यावी, या संदर्भात आज येथील शासकीय विश्रामगृहात प्रांताधिकारी नीता सावंत-शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता माणिक जाधव, सहायक अभियंता प्रकाश पाटील, लिपिक अशोक दांडगे, हळवलमधील जमीन मालक सदानंद पंडित, दिलीप पंडित, आरती पंडित, वल्लभ पंडित, अशोक पंडित, प्रफुल्ल पंडित, भास्कर राणे, राजू राणे, समर्थ राणे आदी उपस्थित होते.

उड्डाणपुलाच्या जोड रस्त्याला 

आमचा विरोध नाही. मात्र जास्तीत जास्त जमिनीचा मोबदला मिळायला हवा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. हळवल येथे ३३ हजार रुपये प्रतिगुंठा असा शासकीय दर आहे. वाटाघाटीने भूसंपादन करीत असताना मूळ मोबदलाच्या अधिक शंभर टक्‍के दिलासा रक्‍कम अधिक २५ टक्‍के व्याजाची रक्‍कम असा एकत्रित मिळूून ७५ हजार १३२ रुपये प्रतिगुंठा दर मिळणार असल्याची माहिती सौ. शिंदे यांनी दिली. मात्र, एवढा कमी दर आम्हाला मान्य नाही अशी भूमिका भास्कर राणे, श्री. पंडित व इतर ग्रामस्थांनी मांडली. 

प्रांताधिकारी सौ. शिंदे यांनी मात्र शासकीय नियम आणि निकष डावलून मोबदला देता येत नसल्याचे स्पष्ट केले. नुकसान भरपाईत जास्तीत जास्त पाच हजार रुपये दर वाढवून देता येऊ शकतो. पण प्रतिगुंठ्याला दीड लाख दर देणे शक्‍य नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

हळवल येथील उड्डाणपुलाच्या जोड रस्त्याच्या ११६ गुंठे क्षेत्रात ५८ खातेदार आहेत. या खातेदारांनी तडजोडीने जमीन न दिल्यास कोणती कार्यवाही करणार असाही प्रश्‍न हळवल ग्रामस्थांनी उपस्थित केला होता. यावर प्रांताधिकाऱ्यांनी भू संपादन प्रक्रिया राबविणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र भू संपादन प्रक्रिया राबविल्यास जमीन मालकांना २५ टक्‍के व्याजाची रक्‍कम देण्याची तरतूद कायद्यात नाही. त्यामुळे ग्रामस्थांना प्रतिगुंठा ७५ हजार १३२ ऐवजी, प्रतिगुंठा ६६ हजार एवढीच रक्‍कम दिली जाईल. त्यामुळे ग्रामस्थांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असेही आवाहन सौ. शिंदे यांनी केले.

Web Title: 75 thousand paid for the road