मालवणजवळ समुद्रात आठ पर्यटक बुडाले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

सर्व बेळगावातील - प्राध्यापकासह तीन विद्यार्थिनी, चार विद्यार्थ्यांचा समावेश

सर्व बेळगावातील - प्राध्यापकासह तीन विद्यार्थिनी, चार विद्यार्थ्यांचा समावेश
मालवण - वायरी भुतनाथ- जाधववाडी येथील समुद्रात आज सकाळी बुडून आठ तरुणांचा मृत्यू झाला. तिघांना वाचविण्यात यश आले. सर्वजण बेळगावमधील मराठा मंडळ इंजिनिअरिंग महाविद्यालयाशी संबंधित आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका प्राध्यापकासह तीन विद्यार्थिनी आणि चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही दुर्घटना आज सकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली.

प्रा. महेश कुडूचकर (वय 35), माया कोले (वय 22), करुणा बेर्डे (वय 22), नितीन मुत्नाळकर (वय 22), मुझामिन हनीकर (वय 22), किरण खांडेकर (वय 22), अवधूत तहसीलदार (वय 22) आणि आरती चव्हाण (वय 22, सर्व रा. बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत. आकांक्षा घाटगे, संकेत सुरेश गाडवी (दोघांचे वय 23) आणि अनिता रामप्पा हानळी (वय 22) या तिघांना वाचविण्यात यश आले. अतिगंभीर बनलेल्या आकांक्षा घाटगेला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. महाविद्यालयातील मुलांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेचा जबर धक्का प्रा. वैदेही देशपांडे, अश्‍विनी रविकांत हरकुनी यांना बसल्याने त्या अत्यवस्थ बनल्या.

बेळगाव येथील मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेजचे 47 जण सहलीसाठी मालवणात आले होते. आज सकाळी त्यातील काहीजण पोहण्यासाठी वायरी येथील समुद्रात उतरले. यातील 11 जण बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी किनाऱ्यावरील लोकांनी आरडाओरड केली. स्थानिकांनी त्यातील तिघांना वाचविले; मात्र आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन तरुणी व सहा तरुणांचा समावेश आहे. बचावलेल्या तिघांना उपचारासाठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाचलेल्यांमध्ये दोन तरुणी व एका तरुणाचा समावेश आहे.

शासनाकडून उपाययोजना नाही
पर्यटन हंगामात गेल्या काही वर्षांत अनेक पर्यटकांचा जीवरक्षकाअभावी बुडून मृत्यू झाला असतानाही शासनाकडून कोणत्याही प्रभावी उपाययोजना केल्या जात नसल्यानेच आज ही घटना घडली असल्याचा आरोप स्थानिक मच्छीमारांनी केला.

नेमके काय घडले?
बेळगावचे 47 विद्यार्थी शनिवारी सकाळी मालवण- वायरीत दाखल.
वीस ते 25 मुला-मुलींचा गट सकाळी 11 च्या दरम्यान समुद्रात उतरला.
स्थानिक मच्छीमारांकडून धोक्‍याची सूचना
समुद्र स्नानानंतर हा गट किनाऱ्यावर परत
त्यातील काहीजण पुन्हा समुद्रात गेले
एका मोठ्या लाटेबरोबर काहीजण आत ओढले गेले
किनाऱ्यावरील उपस्थित सर्वांत एकच कल्लोळ
मच्छीमार तोडणकर आणि सारंग समुद्रात झेपावले
अकरापैकी तिघांना वाचविण्यात यश; उर्वरित आठ जणांचा बुडून मृत्यू