आंबोलीत एक मृतदेह बाहेर काढण्यात यश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

आंबोली - अथक प्रयत्नांनंतर आज पाचव्या दिवशी येथील कावळेसादजवळ खोल दरीत कोसळलेल्या दोघांपैकी प्रताप उजगरे या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यास यश आले. इम्रान गारदीच्या मृतदेहाचा अद्याप पत्ता लागलेला नाही. उद्या (ता. 5) पुन्हा बाबल अल्मेडा टीमच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात येईल. कडा उंच असल्यामुळे मृतदेह वर आणणे शक्‍य नसल्यामुळे 18 किलोमीटर पायपीट करून शिरशिंगेमार्गे मृतदेह बाहेर काढण्याची योजना आहे; मात्र त्यावर अंमलबजावणीचा निर्णय संबंधित पथकांकडे दिला आहे.

दरीमध्ये पडलेल्या दोघा युवकांना बाहेर काढण्यासाठी सांगेली येथील बाबल अल्मेडा यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन कावळेसाद दरीत वरील बाजूने उतरण्याचा निर्णय घेतला. सकाळी साडेदहाच्या सुमारास दोऱ्या टाकून टीमचे कार्यकर्ते दरीत उतरले. दुपारी अडीचच्या सुमारास दोरीच्या साह्याने मृतदेह बाहेर काढला. तो नेमका कोणाचा आहे, हे ओळखण्यासाठी दोन्ही युवकांच्या नातेवाइकांना तेथे बोलावण्यात आले. त्या वेळी तो मृतदेह आपल्या मुलाचा असल्याचे प्रताप याचे वडील अण्णासाहेब उजगरे यांनी सांगितले. त्यानंतर मृतदेह आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला.