शोधमोहिमेतील तरुणांनी रात्र काढली दरीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

आंबोली - येथील कावळेसाद पॉइंट येथून दरीत कोसळलेल्यांच्या शोधमोहिमेत सहभागी दोघे तरुण दरीत अडकल्याने त्यांना कालची रात्र तेथेच काढावी लागल्याचा प्रकार घडला. आज येथील तरुणांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. आजही मृतदेह बाहेर काढण्यात उशिरापर्यंत यश आले नव्हते.

आंबोली - येथील कावळेसाद पॉइंट येथून दरीत कोसळलेल्यांच्या शोधमोहिमेत सहभागी दोघे तरुण दरीत अडकल्याने त्यांना कालची रात्र तेथेच काढावी लागल्याचा प्रकार घडला. आज येथील तरुणांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. आजही मृतदेह बाहेर काढण्यात उशिरापर्यंत यश आले नव्हते.

गडहिंग्लज तालुक्‍यातील प्रताप राठोड आणि इरफान गारदी हे दोघेजण सोमवारी कावळेसाद पॉइंट येथून दरीत कोसळले होते. त्यांची शोधमोहीम आजही सुरू होती. यात बाबल आल्मेडा व त्यांच्या सहकाऱ्यांसह कोल्हापुरातील पथकही सहभागी झाले आहे. काल या शोधमोहिमेत कोल्हापूरच्या पथकातील विनायक कालेलकर व अनिकेत कोदे हे दोरीच्या साहाय्याने दरीत उतरले होते. मात्र विनायक आणि अनिकेत यांना धुके आणि पावसामुळे दरीतून वर येण्याचा मार्ग सापडेना. अखेर त्यांना पूर्ण रात्र दरीतच काढावी लागली. वॉकीटॉकीवरून त्यांनी सहकाऱ्यांना याची माहिती दिली. यानंतर त्यांनी आपल्याला वर काढण्यासाठी मदत मागितली. अखेर आज येथील दीपक मेस्त्री, राकेश आमरुसकर, अमरेश गावडे आदी तरुण त्यांना वर काढण्यासाठी दरीत उतरले. या पथकाला त्यांना बाहेर काढण्यात यश आले.

दरम्यान, आल्मेडा यांच्या टीमने दरीच्या खालच्या बाजूने म्हणजे शिरशिंगे येथून शोधमोहीम सुरू केली. प्रताप राठोड यांचा मृतदेह आधीच दृष्टिपथास पडला आहे; पण तो आजही पाऊस आणि धुक्‍यामुळे वर काढता आला नाही. गारदी याचा मात्र उशिरापर्यंत शोध लागला नव्हता.

चिथावणीखोरांनाही शोधण्याची मागणी
सावंतवाडी - आंबोली येथील कावळेसाद दरीत कोसळलेल्या त्या युवकांना त्याठिकाणी असलेल्या अन्य काही लोकांनी चेतविल्याने नशेत त्यांनी हा प्रकार केला असावा, त्यामुळे ती चित्रफीत तयार करणाऱ्यासोबत त्यांना चिथविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली आहे. दरम्यान, याबाबत आपण नक्कीच संबंधितांचा शोध घेऊ; परंतु दरीत अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी आमचे पहिले प्रयत्न आहेत. त्यानंतर पुढील तपास करू, असे पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांनी सांगितले.