माजी जगज्जेत्यावर मात करणारा ‘अभिषेक’

माजी जगज्जेत्यावर मात करणारा ‘अभिषेक’

रत्नागिरी - रत्नांची खाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरीत अनेक रत्न आहेत. कॅरममध्ये रियाज अकबर अलीने आंतरराष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीचे नाव नोंदवले. त्याचा वारसदार म्हणून अभिषेक चव्हाण नावारूपाला येऊ पाहत आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या मंडपे सीव्हीक राज्य स्पर्धेत माजी जगज्जेता योगेश परदेशीवर धक्‍कादायक विजय मिळवून अभिषेकने महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली. नोकरीअभावी अस्थिर असलेल्या अभिषेकला प्रबळ इच्छाशक्‍तीने हे यश मिळवून दिले.

यानिमित्ताने महाराष्ट्र संघाचे दरवाजे त्याच्यासाठी खुले झाले आहेत.
जिल्हा स्पर्धांमध्ये नाव कमवलेल्या अभिषेकला मार्ग मिळत नव्हता. एसटीमध्ये मेकॅनिक म्हणून निवृत्त झालेल्या वडिलांनंतर घराची जबाबदारीही अभिषेकवर होती. खेळण्याची इच्छा आणि दुसरीकडे घराची जबाबदारी या कात्रीत तो अडकला होता, मात्र त्याने नियमित सराव सोडला नव्हता. घरची बेताची परिस्थिती असतानाही अभिषेक यशासाठी झुंजत होता. मुंबईतील चौथ्या मंडपेश्‍वर सीव्हीक फेडरेशन राज्य मानांकन कॅरम स्पर्धेपूर्वी अभिषेक हे नाव फक्‍त रत्नागिरी जिल्ह्यापुरते मर्यादित होते. स्पर्धेपूर्वी अभिषेकमधील दर्जेदार कॅरमपटूची ओळख नव्हती, पण मुंबईतील त्या स्पर्धेत एक एक सामना जिंकत गेला, तसा प्रेक्षकांच्या नजरेत तो आला. उपांत्य फेरीतही त्याने माजी जगज्जेता प्रशांत मोरेला नमवून विजयाच्या दिशेने आगेकूच केली.

अंतिम सामन्यात त्याची गाठ नामवंत माजी जगज्जेता योगेश परदेशीबरोबर पडली. सुरवातीपासून अभिषेकवर दडपण होतेच. प्रत्येक डाव महत्त्वाचा होता. स्ट्रायकर हातात येईल की नाही, अशी शंका मनात येत होती; पण प्रेक्षकांचा पाठिंबा नवख्या अभिषेकला मिळाला. पहिला सेट त्याने १२-२५ ने जिंकला, अन्‌ त्याचा आत्मविश्‍वास वाढला. दुसरा सेट नवव्या डावापर्यंत रंगला. त्याच डावात अभिषेकने १६-१७ असा एका पॉइंटने सेट जिंकला. रत्नागिरीच्या या कॅरमपटूला आभाळही ठेंगणे पडले. स्पर्धेने त्याला महाराष्ट्राच्या संघाचे दरवाजे खुले झाले आहेत. राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचे त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते, त्याचीही पूर्तता या निमित्ताने झाली, असे त्याने सांगितले.

सोंगट्या वेचताना कॅरमपटू बनलो
शिर्के हायस्कूलला शिक्षण पूर्ण करणाऱ्या अभिषेकच्या कॅरम खेळण्याची सुरवात एसटी कॉलनीतून झाली. अंगणात रंगणारे कॅरमचे सामने तो आवडीने पाहत होता. बाद झालेल्या सोंगट्या वेचून देण्याचे काम तो करायचा. त्याचे कॅरम वेड पाहून आनंद पवार यांनी सागर कुलकर्णीशी भेट घालून दिली. बाळू शेट भिंगार्डे यांच्या क्‍लबमध्ये तो सराव करू लागला. १४ व्या वर्षी राधाकृष्ण मंदिर येथील ज्युनिअर गटाचे विजेतेपद पटकावून जिल्हास्तरावरील विजयाचा प्रारंभ केला. दहा वर्षांनंतर राज्यस्तरीय स्पर्धेचे विजेतेपद मिळवून राष्ट्रीयस्तरावर भरारी घेण्यासाठी तो सज्ज झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com