घरासमोर हायमास्ट हा अधिकाराचा गैरवापर - रवींद्र पोळेकर

गुहागर - नवनीत ठाकूर यांच्या घरासमोरील वादग्रस्त ‘हायमास्ट’.
गुहागर - नवनीत ठाकूर यांच्या घरासमोरील वादग्रस्त ‘हायमास्ट’.

गुहागर - वेळणेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर सीआरझेडच्या उल्लंघनाबरोबरच सरपंच नवनीत ठाकूर यांनी आपल्या घरासमोर हायमास्ट बसविला आहे. जनतेच्या सोयीसाठी शासनाने मंजूर केलेला हायमास्ट दिवा वेळणेश्वर मंदिरापाठी न उभारता स्वत:च्या घरासमोर उभारून त्यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याची तक्रार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे रवींद्र पोळेकर यांनी सांगितले.

पोळेकर म्हणाले की, पर्यटन व्यवसायाचा हवाला देऊन स्वत:ला वाचवू पाहाणारे सरपंच नवनीत ठाकूर आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करीत आहेत. लोकप्रतिनिधीच कायद्याचे उल्लंघन करू लागले तर जनतेला कोण थांबविणार. गुहागर तालुक्‍यात पर्यटन व्यवसायाचा विकास होण्यापूर्वीपासून हेदवी, वेळणेश्वरमध्ये पर्यटन व्यवसाय सुरू आहे.

कायद्याच्या चौकटीत राहून पर्यटकांची सोय अनेकजण करत आहेत. दंड भरला याचा अर्थ कायद्यातून माफी मिळाली असा होत नाही. धनश्री जामसूतकर सरपंच असताना पर्यटनामधून वेळणेश्वर मंदिराजवळ १ व समुद्रकिनाऱ्यावर दुसरा हायमास्ट लावणे तसेच मंदिरापासून समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदीप लावणे या कामांसाठी एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे केला होता. मोजणी करून प्रस्ताव तयार झाला. 

प्रत्यक्षात १ हायमास्ट नवनीत ठाकूर यांच्या घरासमोर समुद्रावर उभा करण्यात आला. वेळणेश्वर मंदिराच्या मागे हा हायमास्ट लावला असता तर अनेक पर्यटकांची सोय झाली असती. मात्र, हायमास्टची जागा बदलली ती सत्तेच्या दुरुपयोगानेच, असा आरोप पोळेकर यांनी केला आहे.
 

‘‘हा हायमास्ट मी सरपंच होण्यापूर्वी आमदार उदय सामंत पालकमंत्री असतानाच्या काळात मंजूर झाला आहे. तो माझ्या दारात बसविलेला नाही, तर एमटीडीसी रिसॉर्टमधील पर्यटक ज्या मार्गाने समुद्रावर जातात त्या मार्गावर बसविलेला आहे. ज्या हायमास्ट आणि पथदीपांसाठी सर्व्हे झाला ते उभारण्यासाठी त्या वेळी ग्रामपंचायतीकडे स्वमालकीची जागा होती का, याचाही माहिती घेऊन आरोप झाले असते तर बरे झाले असते. अर्धवट माहितीवरून बेछूट आरोप केले जात आहे. मात्र, जनता सुज्ञ आहे.’’
 - नवनीत ठाकूर, सरपंच, वेळणेश्वर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com