मोटार झाडावर आदळून सात तरुण ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

गॅसकटर वेळेवर उपलब्ध नाही
अपघातग्रस्त मोटार कापण्यासाठी कटर उपलब्ध झाला असता, तर आणखी दोघांचे प्राण वाचविता आले असते. महामार्गावर अपघातग्रस्त वाहनांसाठी क्रेनचीही कमतरता जाणवते. गेल्या महिन्यात चॉंदसूर्याच्या उतारावर खेडशीनजीक दोन गाड्यांच्या धडकेत दोन्ही चालक आत अडकून पडले असतानाही गॅसकटर वेळेवर उपलब्ध झाला नव्हता. महामार्गावर मदत करणाऱ्या तरुणांची एक गॅसकटर मिळावा, अशी मागणी आहे.

रत्नागिरी/पाली - मुंबई-गोवा महामार्गावर खानू येथे आज सकाळी भरधाव मोटार झाडावर आदळून भीषण अपघात झाला. त्यात मोटारीतील आठपैकी सात जण जागीच ठार झाले. एका गंभीर जखमीला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मृत्युमुखी पडलेले 25 ते 35 वयोगटातील आहेत. सर्व जण विलेपार्ले-शिवाजीनगर (मुंबई) येथील रहिवासी होते.

सकाळी साडेसातच्या सुमारास अपघात झाला. मोटार (एमएच 06 एएस 6291) झाडावर आदळली. ती सर्व बाजूंनी चेपली गेली. गाडीचा एखादा दरवाजा वा भाग तुटून न पडता ती आत चेपली गेली. अपघातात मयूर वामन केर्लेकर (वय 26), प्रशांत जगन्नाथ गुरव (चालक, 31), सचिन विश्‍वनाथ सावंत (30), अक्षय शंकर केरकर (24), निहाल कोटीयन (22), वैभव दामोदर मनवे (32), केदार बंडू तोडकर (28, सर्व रा. विलेपार्ले-शिवाजीनगर) जागीच ठार झाले; तर अभिषेक उदय कांबळी (32) गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी जिल्हा रुग्णालयाच्या 108 वाहिनीने सात मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शवागृहात आणले.

ग्रामीण पोलिसांनी सांगितले, की मंगळवारी (ता. 7) प्रशांत गुरव मोटार घेऊन रात्री साडेबाराच्या सुमारास विलेपार्ले येथून गोव्याला जाण्यासाठी निघाले. त्यांच्यासोबत आयटी क्षेत्रात काम करणारे सात मित्र होते. सकाळी साडेसात वाजता खानू येथे वेगात असलेल्या मोटारीवरील चालकाचा ताबा सुटला. विरुद्ध बाजूला जाऊन मोटार प्रथम फणसाच्या झाडावर आदळली. त्या धडकेने रस्त्यालगतच्या दहा ते बारा फूट खोल गटारात जाऊन आपटली. अपघाताचा आवाज महामार्गालगतच्या आजूबाजूच्या वस्त्यांवरही ऐकायला गेला. धुरळा आकाशात उडाला. त्यामुळे महामार्गावर स्फोट झाला की काय, अशी शंका काही जणांना आली. ग्रामस्थ आवाजाच्या ठिकाणी धावले. मात्र अपघात पाहून अनेकांना घाम फुटला. मोटारीचा चक्काचूर झाला होता. सर्व प्रवासी आत अडकून पडले होते. जखमींची अवस्था अतिगंभीर होती. चालकाच्या बाजूला बसलेले अभिजित कांबळी ओरडत होते. पोलिसांनी त्यांना प्रथम बाहेर काढले. उर्वरित मृतदेह बाहेर काढण्यासाठी दीड तास अपुरा पडला. धडकेने मोटारीचे दरवाजे लॉक झाले आणि पत्रा दबला गेला. त्यामुळे ते गाडीतच अडकून पडले. क्रेनने प्रथम मोटार महामार्गावर आणली व गॅसकटरच्या साह्याने मागचे दरवाजे कापून काढले. दरम्यान, आतील सर्व जण मृत झाले होते. मोटार झाडावर अडकल्याने बसलेला धक्का व गाडी चेपली गेल्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला, असा प्राथमिक अंदाज आहे.

मृतदेह बाहेर काढण्यासाठी पालीतील सचिन सावंत, अमेय वेल्हाळ, अमर कोलते, विवेक सावंत, चंदू कुलकर्णी, संतोष आयरे, प्रशांत चव्हाण, किरण सावंत यांच्यासह हातखंब्यातील मुन्ना देसाई, मोरेश्‍वर कासारे यांनी मदत केली.

पोलिस निरीक्षक अनिल विभूते, शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक इंद्रजित काटकर, सहायक पोलिस निरीक्षक भोये, चित्रा मढवी यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाला.

गॅसकटर वेळेवर उपलब्ध नाही
अपघातग्रस्त मोटार कापण्यासाठी कटर उपलब्ध झाला असता, तर आणखी दोघांचे प्राण वाचविता आले असते. महामार्गावर अपघातग्रस्त वाहनांसाठी क्रेनचीही कमतरता जाणवते. गेल्या महिन्यात चॉंदसूर्याच्या उतारावर खेडशीनजीक दोन गाड्यांच्या धडकेत दोन्ही चालक आत अडकून पडले असतानाही गॅसकटर वेळेवर उपलब्ध झाला नव्हता. महामार्गावर मदत करणाऱ्या तरुणांची एक गॅसकटर मिळावा, अशी मागणी आहे.

Web Title: Accident in Ratnagiri; 7 killed