दिग्गज कलावंतांना काढले विश्रामगृहाबाहेर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

कुडाळ - नाट्यप्रयोगासाठी आलेल्या डॉ. गिरीश ओक, जयंत सावरकर, रवी पटवर्धन, अविनाश खर्शीकर या दिग्गज कलावंतांसह अन्य कलावंतांचे साहित्य ओरोस शासकीय विश्रामगृहातून मध्यरात्री बाहेर फेकण्याचा आणि त्यांना बाहेर काढण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (ता. 31) मध्यरात्री घडला.

कुडाळ - नाट्यप्रयोगासाठी आलेल्या डॉ. गिरीश ओक, जयंत सावरकर, रवी पटवर्धन, अविनाश खर्शीकर या दिग्गज कलावंतांसह अन्य कलावंतांचे साहित्य ओरोस शासकीय विश्रामगृहातून मध्यरात्री बाहेर फेकण्याचा आणि त्यांना बाहेर काढण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (ता. 31) मध्यरात्री घडला.

जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नातेवाइकांना विश्रामगृह रिकामे करून देण्यासाठी अगदी महिला कलावंतांच्या खोलीत घुसून त्यांचे कपडे व बॅगाही बाहेर काढण्यात आल्या. साठ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच अधिकाऱ्यांचा हा दहशतवाद अनुभवल्याची खंत या दिग्गज कलावंतांनी व्यक्त केली. "तुज आहे तुजपाशी' या नाटकासाठी डॉ. ओक यांच्यासमवेत हे कलावंत काल जिल्ह्यात आले. गोव्यानंतर ते ओरोस येथे नाट्यप्रयोगासाठी पोचले. आयोजकांनी त्यांची व्यवस्था ओरोसच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर केली होती. तेथून हे कलाकार बुधवारी सावंतवाडीला जाणार होते. ओरोसमधील नाट्यप्रयोग उद्‌घाटन कार्यक्रम लांबल्याने उशिरा सुरू झाला. याच दरम्यान हा प्रकार घडला.

याबाबतची माहिती येथे डॉ. ओक यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, 'जिल्हा परिषदेच्या "त्या' अधिकाऱ्याकडे काल रात्री खासगी कार्यक्रम होता. घरी आलेल्या पाहुण्यांची पर्यायी सोय व्हावी म्हणून त्यांनी विश्रामगृहातील खोल्या रिकाम्या करण्याचा आदेश मध्यरात्री अडीच वाजता दिला. या वेळी आमचा नाट्यप्रयोग सुरू होता. विश्रामगृहाचा कर्मचारी तेथे किल्ली मागण्यासाठी आला आणि खोली रिकामी करायचा आदेश असल्याचे सांगितले. विश्रामगृहावर महिला कलाकारांच्या खोलीत घुसून त्यांच्या बॅगा, कपडे व इतर साहित्य बाहेर टाकले होते. नंतर आमचेही साहित्य बाहेर काढण्यात आले.'' हे सांगताना डॉ. ओक यांना अक्षरशः रडू कोसळले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची सुसंस्कृत म्हणून ओळख आहे. येथे कलाकारांना कायमच आदर मिळाला. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेसुद्धा याच जिल्ह्यातील आहेत. गेल्या साठ वर्षांच्या प्रवासात कधीही एखाद्या अधिकाऱ्याकडून अशी वागणूक मिळाली नाही. काल घडलेला प्रकार मात्र खूपच भयानक आहे.
- जयंत सावरकर, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन

Web Title: actor out to guest house