जि. प. अध्यक्षपदासाठी आदितीच!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

अलिबाग - रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या शर्यतीतून पेणच्या शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्या ॲड. नीलिमा पाटील यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्ष आघाडीकडून अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे व उपाध्यक्षपदासाठी शेकापचे आस्वाद पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन चिटणीस ॲड. परेश देशमुख यांनी तसे पत्रकच सोमवारी (ता.२०) प्रसिद्ध केले आहे. मंगळवारी (ता. २१) अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या ५९ जागांपैकी शेकापकडे २३; तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे १२ सदस्य आहेत. आघाडीचे एकूण ३५ सदस्य आहेत. यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक आघाडीचे उमेदवार जिंकणार हे स्पष्ट आहे. विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेकडे १८; तर काँग्रेस व भाजपचे तीन सदस्य आहेत. तरीही शिवसेनेने अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याचा चंग बांधल्याने चुरस कायम आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपद आपल्यालाच मिळावे, अशी मागणी शेकाप व राष्ट्रवादीकडून होत होती. राष्ट्रवादीकडून आदिती तटकरे; तर शेकापकडून ॲड. नीलिमा पाटील व चित्रा पाटील यांची नावे चर्चेत होती. मागील काही दिवसांपासून शेकाप व राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी आदिती तटकरे यांचे नाव निश्‍चित केल्याची चर्चा होती. त्यानंतर पेणच्या शेकाप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. पेण तालुक्‍यातील पाचही जागा शेकापने जिंकल्या असल्याने नीलिमा पाटील यांनाच अध्यक्ष बनवावे, अशी मागणी करण्यात येत होती. सोशल नेटवर्किंग साईटवरही तसे संदेश झळकत होते.

सोमवारी शेतकरी कामगार पक्षाच्या अलिबाग कार्यालयातून अध्यक्षपदासाठी आदिती तटकरे; तर उपाध्यक्ष पदासाठी आस्वाद पाटील यांची उमेदवार म्हणून निवड केल्याचे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. यामुळे मागील काही दिवसांपासून असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

सभापतिपदावर  बोळवण
अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार असलेल्या ॲड. नीलिमा पाटील यांना अध्यक्षपदाची उमेदवारी नाकारली असली, तरी त्यांना जिल्हा परिषदेतील महत्त्वपूर्ण असलेले अर्थ व बांधकाम सभापतिपद दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे; तर शेकापकडून आणखी एक अध्यक्षपदाच्या दावेदार असलेल्या चित्रा पाटील यांना मात्र कोणतेही सभापतिपद मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे. उपाध्यक्षपदाचे उमेदवार आस्वाद पाटील हे चित्रा पाटील यांचे पती आहेत.

Web Title: aditi tatkare zp president