सात-बारा हस्तलिखित न मिळाल्यास तीव्र आंदोलन 

सात-बारा हस्तलिखित न मिळाल्यास तीव्र आंदोलन 

कणकवली - गेली काही वर्षे सात-बारा संगणकीकरण सुरू असून शेतकऱ्यांना त्यांचे सात-बारा, फेरफार नोंदी तसेच अन्य दस्तऐवजासाठी लागणारे सात-बारा दिले जात नसल्याने संतप्त कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज येथील तहसीलदारांना घेराओ घातला. येत्या आठ दिवसांत प्रत्येक गावात तलाठ्यांची उपस्थिती, हस्तलिखित सात-बारा आणि दस्तनोंदणीचे काम वेळीच न सुधारल्यास कॉंग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा तालुकाध्यक्ष सुरेश सावंत आणि तुळशीदास रावराणे यांनी या वेळी दिला आहे. 

कणकवली तहसील कार्यालयात सात-बारा संगणकीकरणाचे काम सुरू असून राज्य शासनाच्या लेखी आदेशानंतर हस्तलिखित सात-बारा देणे थांबविले आहे. परंतु तालुक्‍यातील 105 महसुली गावांत कोणतीही ऑनलाइन यंत्रणा नसल्याने तलाठ्यांना तहसील कार्यालयात येऊन ऑनलाइन नोंदी घालाव्या लागतात. अशा विविध कारणांमुळे महसूल पातळीवरील अनेक कामे खोळंबून आहेत. कर्ज उचलण्यापासून शेतीच्या लागवडीपर्यंतचा संबंध सात-बाराशी असून नव्या घराचे बांधकाम असो वा दुरुस्ती असो, यासाठी तलाठ्यांकडून होणाऱ्या अडवणुकीच्या आणि शासनाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे आंदोलन छेडण्यात आले. तहसीलदार एस. जी. जाधव, नायब तहसीलदार भारतकुमार रजपूत, पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्याशी चर्चा झाली. या वेळी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, उपसभापती दिलीप तळेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे, जिल्हा परिषद सदस्य बाळ जठार, स्वरूपा विखाळे, कॉंग्रेसच्या जिल्हा महिलाध्यक्षा प्रणिता पाताडे, तालुकाध्यक्षा स्वाती राणे, याचबरोबर जि.प. व पं.स.चे सदस्य, सरपंच, शेतकरी आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांनी बंदोबस्तही ठेवला होता. विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर ऑनलाइन सात-बाराचे काम पूर्ण करून कामात सुधारणा होईल, असे आश्‍वासन तूर्तास देण्यात आले. यावर कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले नसून आठ दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com