रायगडमध्ये वर्षा पर्यटनात यंदा 16 जणांचा बळी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

अलिबाग - यंदा रायगड जिल्ह्यात कोसळलेल्या विक्रमी पावसामुळे बहरलेल्या वर्षा पर्यटनात आतापर्यंत 16 पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. पर्यटकांचा "काळ' ठरलेल्या काही स्थळांवर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला. मात्र, त्यानंतरही हुल्लडबाजी, मद्यप्राशन, बेफिकिरीमुळे पर्यटकांचे मृत्यू रोखता आले नाहीत.

निसर्गाचा वरदान ठरलेल्या जिल्ह्यातील कर्जत तालुक्‍यातील सोलनपाडा, आषाणे धबधबा, पनवेल तालुक्‍यातील मोर्बे धरण ही या वर्षी मृत्यूची ठिकाणे ठरली, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी सागर पाठक यांनी दिली. त्यातच माणगाव तालुक्‍यातील नव्यानेच प्रसिद्धीस आलेल्या देवकुंड धबधब्याने भर घातली. धोकादायक पर्यटन स्थळांवर जाऊ नये, यासाठी पोलिसांनी या स्थळांकडे जाणारे मार्ग बंद केले होते. तरीही आडमार्गाने जाणाऱ्या पर्यटकांना थोपविण्यात यश आले नाही.

यंदा 10 जण कर्जत तालुक्‍यातील सोलनपाडा व आषाणे धबधब्यांवर बुडून मृत्युमुखी पडले आहेत. पेब किल्ल्यावर गिर्यारोहणाचा आनंद लुटण्यासाठी आलेले दोघे जण दरीत कोसळून जखमी झाले होते. त्यांचेही उपचारादरम्यान निधन झाले होते.