अंगणवाडी सेविकांना नोटीस बजावणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

अलिबाग - कर्जत तालुक्‍यातील 31 कुपोषित बालकांना मंगळवारी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर यातील तीन तीव्र कुपोषित बालकांना मुंबईतील केईएम रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोरेवाडी येथील कुपोषित बालिकेच्या मृत्यूनंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. अंगणवाडी सेविकांच्या संपकाळात हे कुपोषण वाढल्याचे समोर येत आहे. त्याबद्दल संबंधित अंगणवाडीच्या सेविकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येणार आहेत.

कर्जतच्या ग्रामीण भागातील 31 कुपोषित बालकांना अलिबागला दाखल करण्यात आल्यानंतर तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून उपचार सुरू आहेत. या बालकांना सकाळी जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर तज्ज्ञ डॉक्‍टरांनी त्यांची तपासणी केली. यामध्ये तीन बालके तीव्र कुपोषित असल्याचे आढळून आले. एकाला मूत्रपिंडाचा आणि दोघांना हृदयविकाराचा त्रास आहे.

त्यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करणे शक्‍य नसल्याने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली.