अलिबागच्या पालकांची दाखल्यासाठी पेणवारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

ऐन प्रवेशाच्या हंगामात प्रांताधिकारी रजेवर

ऐन प्रवेशाच्या हंगामात प्रांताधिकारी रजेवर
अलिबाग - दहावी, बारावीचे निकाल लागल्याने पालक मुलांच्या पुढील प्रवेशासाठी लागणाऱ्या नॉन क्रिमिलियर व जातीच्या दाखल्यासाठी अलिबागच्या तहसीलदार कार्यालयात अर्ज करीत आहेत; मात्र अलिबागचे प्रांताधिकारी महिन्याच्या रजेवर गेल्याने हे दाखले मिळविण्यासाठी पेणच्या प्रांताधिकारी कार्यालयाची वारी करण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे.

दहावी, बारावीचा निकाल लागून 15 दिवस उलटले आहेत. नवीन प्रवेशासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलियर असे दाखले शाळा, महाविद्यालयांमध्ये लागतात. त्याचबरोबर इतर कामांसाठी व निवडणुकीसाठी जातीचा दाखला घ्यावा लागतो. जातीचा व नॉन क्रिमिलियर दाखल्यासाठी प्रांताधिकारी यांची सही आवश्‍यक असते; मात्र अलिबागचे प्रांताधिकारी महिनाभराच्या रजेवर गेल्याने त्यांचा अतिरिक्त भार पेणच्या प्रांताधिकाऱ्यांकडे दिला आहे.

दाखल्यासाठी पेणला ये-जा करावे लागत असल्याने पालकांना या सर्व प्रक्रियेचा मनःस्ताप होत असून, आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे.

पेण कचेरीवर ताण
अलिबाग तहसील कार्यालयात रोज 150 ते 200 अर्ज विविध प्रकारचे दाखले मिळण्यासाठी दाखल झालेले असतात. हे सर्व अर्ज एकत्र करून पेण प्रांताधिकारी कार्यालयात पाठविले जातात; मात्र अलिबागसह पेणमधील पालकांचीही दाखले मिळविण्यासाठी गर्दी होत असल्याने त्याचा ताण पेणच्या प्रांताधिकारी कार्यालयावर येतो. त्यामुळे दाखले मिळण्यास विलंब लागत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.