महावितरणचे अधिकारी, कर्मचारी तणावाखाली

महावितरणचे अधिकारी, कर्मचारी तणावाखाली

अलिबाग - उपविभागीय उपअभियंत्यांसह वीजसेवकांच्या रिक्त असलेल्या जागा, काही वीजसेवकांच्या त्यांच्या गावाजवळ झालेल्या बदल्यांमुळे अन्य कर्मचाऱ्यांवर कामाचा येणारा ताण, ग्राहकांचे कर्मचाऱ्यांना मिळत नसलेले सहकार्य, पावसाळ्यात वीजप्रवाह खंडित होताच तो सुरळीत होण्यासाठी कामावरील वेळेचे नसलेले बंधन आणि वीज वसुलीच्या तगाद्यामुळे महावितरणच्या अलिबाग उपविभाग एक आणि अलिबाग उपविभाग दोनमधील अधिकाऱ्यांसह वीज कर्मचारी आजही तणावाखाली वावरत आहेत.

अलिबाग उपविभाग एकमध्ये अलिबाग ते रेवदंडा, अलिबाग, रामराज ते कुदेपर्यंत, अलिबाग शहर, वरसोली, बामणोली, मानिभुते, कार्लेखिंड आदी भाग येतो, तर अलिबाग उपविभाग दोनमध्ये शहाबाज, माडंवा, रेवस, सांबरी, पोयनाड आदी भाग येतो. या दोन्ही भागांसाठी ३१० वीजसेवकांची गरज असताना अलिबाग उपविभाग एकमधून ३३, तर अलिबाग उपविभाग दोनमधून ३२ अशा ६५ कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जवळच्या गावी राज्यात बदली करून घेतल्याने दोन्ही विभागांतील अन्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येऊ लागला आहे. उपविभाग एकमध्ये ३३ पैकी फक्त ११ नवीन वीजसेवकांची महावितरणने भरती केली. उर्वरित ४९ कर्मचाऱ्यांच्या जागा आजही रिक्त आहेत.

अलिबाग उपविभाग दोनमध्ये ३२ पैकी फक्त आठ नवीन वीजसेवकांची महावितरणने भरती केली असून, उर्वरित ९९ कर्मचाऱ्यांच्या जागा आजही रिक्त आहेत. दोन्ही विभागांत रिक्त असलेल्या १४८ जागा न भरल्याने कामाचा अन्य कर्मचाऱ्यांवर कमालीचा ताण येत आहे. त्यातच वीजप्रवाह खंडित झाल्यानंतर अनेक ग्राहकांचे कार्यालयात फोन घणघणत असतात; मात्र कोणत्या ठिकाणी मोठा आवाज झाला, झाड पडले, पक्षी चिकटला याबाबत माहिती ग्राहक देत नसल्याने वीज अधिकारी आणि वीज कर्मचारी दोष शोधण्यासाठी तासन्‌तास दिवस-रात्र फिरत असतात. त्यातून दोष न सापडल्यास आणि वीजप्रवाह वेळेवर सुरळीत न झाल्यास ग्राहकांच्या रोषालाही अधिकाऱ्यांसह वीज कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागते, असे वीज अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

महावितरण कंपनीने उपअभियंते आणि वीजसेवकांच्या रिक्त जागा तातडीने भरल्यास अन्य कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन चांगले राहून जलदगतीने ग्राहकांना विजेची सेवा देऊ शकतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तशी मागणीही महावितरणकडे सर्बोनेट इंजिनिअर असोसिएशनने केली आहे; मात्र त्याबाबत आजही महावितरणकडून पावले उचलली गेली नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

अलिबाग तालुक्‍यात दोन्ही विभागांतील रिक्त जागा लवकरच भरण्यासाठी वरिष्ठांकडे तसा प्रस्ताव पाठविला आहे. टप्प्याटप्प्याने उर्वरित कर्मचारी मिळण्यासाठी तसे प्रयत्नही सुरू आहेत.
- प्रकाश तनपुरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, अलिबाग उपविभाग-१

उपविभागीय उपअभियंते रिक्त जागा
फणसापूर    १
चौल        १
अलिबाग    १ 

अलिबाग उपविभाग -१
वीज प्रवाह खंडित झाल्यास संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 
अलिबाग ः ०२१४१-२२२१०९
                    ०२१४१-२२२०४१
 उसर ः ७८७५७६५५४०
             ०२१४१-२६५३४४
अलिबाग उपविभाग -२
अलिबाग - ७८७५५४३७३१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com