रत्नागिरी पर्यटन विकासासाठी आराखडा आधीच तयार - किशोरी गद्रे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

रत्नागिरी - रत्नागिरीच्या पर्यटनवाढीसाठी हापूस आंब्यासह नेमक्‍या गोष्टींचे ब्रॅंडिंग व्हावे. ब्रॅंडिंगसाठी रत्नागिरीचे ॲप बनवता येईल. हॉटेल्समध्ये ऐतिहासिक, पर्यटनस्थळांची छायाचित्रे लावता येतील.

पर्यटनस्थळी जाण्यासाठी रस्त्यांचा विकास झाला पाहिजे. रत्नागिरीच्या १५० स्थळांचा आराखडा मी तयार केला आहे. आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र प्लॅन आखता येईल. यासाठी हर्षा हॉलिडेजने पुढाकार घ्यावा, असे मत महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या माजी सरव्यवस्थापक किशोरी गद्रे यांनी व्यक्त केले.

रत्नागिरी - रत्नागिरीच्या पर्यटनवाढीसाठी हापूस आंब्यासह नेमक्‍या गोष्टींचे ब्रॅंडिंग व्हावे. ब्रॅंडिंगसाठी रत्नागिरीचे ॲप बनवता येईल. हॉटेल्समध्ये ऐतिहासिक, पर्यटनस्थळांची छायाचित्रे लावता येतील.

पर्यटनस्थळी जाण्यासाठी रस्त्यांचा विकास झाला पाहिजे. रत्नागिरीच्या १५० स्थळांचा आराखडा मी तयार केला आहे. आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र प्लॅन आखता येईल. यासाठी हर्षा हॉलिडेजने पुढाकार घ्यावा, असे मत महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या माजी सरव्यवस्थापक किशोरी गद्रे यांनी व्यक्त केले.

मैत्री ग्रुप संचलित हर्षा हॉलिडेजचे उद्‌घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. अंबर हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला व्यासपीठावर नगराध्यक्ष राहुल पंडित, मैत्री ग्रुपचे संचालक कौस्तुभ सावंत, दै. ‘सकाळ’चे रत्नागिरी आवृत्तीप्रमुख शिरीष दामले, पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर, हॉटेल उद्योजक उदय लोध उपस्थित होते.

आंजर्ले येथे आजोळ व गुहागरमध्ये सासर असल्याने मला रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनवाढीमध्ये लक्ष घालायला आवडेल. रत्नागिरीचे ब्रॅंडिंग करून नेमकेपणाने पर्यटकांना आकर्षित करता येईल, असे गद्रे यांनी सांगितले. मुंबई, पुण्यातील २५०० पुरातन वास्तू, पर्यटनस्थळांना क्‍यूआर कोड दिला असून तो मोबाइलवर स्कॅन केला की लगेच त्या स्थळाची माहिती मिळते, असे त्यांनी सांगितले.

रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुहेत थ्रिल आहे. शहर परिसरातही अनेक स्थळांचा विकास करण्याच्या दृष्टीने पालिका नक्कीच प्रयत्न करून बदल घडवेल, असे नगराध्यक्ष पंडित यांनी सांगितले.

मैत्री ग्रुपचे संचालक सुहास ठाकूरदेसाई, महेश शिंदे, कांचन आठल्ये यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कौस्तुभ सावंत यांनी हर्षा हॉलिडेजची संकल्पना विशद केली. शहरातील सर्व हॉटेल व्यावसायिकांना एकत्र करून हा उपक्रम पुढे नेण्याचा आणि त्यायोगे रत्नागिरी शहराला पर्यटन क्षेत्रात चांगले स्थान मिळवून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

श्री. दामले यांनी सांगितले की, पायाभूत सुविधा देणे सरकारचे काम असले तरी सर्वच गोष्टींची अपेक्षा ठेवू नये. सन १९८३ मध्येही पर्यटन परिषद झाली होती. स्थानिकांनी पर्यटनवाढीसाठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. श्री. मसुरकर यांनी दानशूर भागोजीशेठ कीर व मुंबईचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर जन्मस्थान, हरजी भाटकर यांची समाधी, इंग्रजांनी बांधलेला नाचणे तलाव या स्थळांचा उल्लेख केला. मांडवी बंदर ते मुरलीधर नाक्‍यापर्यंत वैमानिक डी लॅकमन पॅट (दत्तात्रय पटवर्धन) यांची जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांच्या साथीने निघालेली ऐतिहासिक मिरवणूक आदी गोष्टींचा आढावा घेतला. रत्नागिरीत शैक्षणिक सहलीसाठी ४००-५०० गाड्या येतात. गाईड्‌सना प्रशिक्षण दिल्यास रत्नागिरीतील ठिकाणांची माहिती विद्यार्थ्यांना देता येईल, असा विचारही व्यक्त केला.
शहरातील पर्यटनस्थळांवर पाट्या लावण्यासाठी हॉटेल व्यावसायिक प्रायोजकत्व देतील, असे लोध यांनी सांगितले. गोव्यातील दोन नद्यांमुळे पर्यटन वाढले, पण रत्नागिरीत पाच नद्या असूनही कुठेही पर्यटन विकास झाला नाही. यासाठी आपला जोरदार प्रयत्न आहे. भाट्ये येथे मेरिटाईम म्युझियम करण्याचा विचार कॅप्टन दिलीप भाटकर यांनी सांगितला. 

यावेळी कातळशिल्पाचे संशोधक सुधीर रिसबूड यांचा सत्कार झाला. या वेळी उद्योजक दीपक गद्रे, मनोज कळके, बिपीन बंदरकर, उदय बने, संतोष तावडे, राजेश म्हापुस्कर, मिलिंद मिरकर, महेश पाध्ये, उमेश कुळकर्णी, यासह रत्नागिरीतील हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते. ज्योती मुळ्ये यांनी सूत्रसंचालन केले.

‘सकाळ साप्ताहिक’ अंकाचे प्रकाशन
सकाळ साप्ताहिकच्या कोकण पर्यटन विशेषांकाचे प्रकाशन किशोरी गद्रे व मान्यवरांच्या हस्ते झाले. या अंकामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांची परिपूर्ण माहिती दिली आहे. नवी पर्यटनस्थळे आणि आता नाताळ, वर्षअखेरीस येणाऱ्या पर्यटकांना हा अंक उपयुक्त ठरणार आहे.

Web Title: Already prepared a plan for the development of tourism Ratnagiri