कुंभवडेचा जगाशी संपर्क तुटला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

आंबोली - नवा रस्ता करण्याच्या नावाखाली कुंभवडे गावचा जगाशी असलेला संपर्कच तोडण्यात आला आहे. यामुळे कुंभवडेवासीयांना पावसाळ्याचे चार महिने कसे काढायचे असा प्रश्‍न पडला आहे. ग्रामस्थांच्या वाहतुकीची तात्पुरती व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

आंबोली - नवा रस्ता करण्याच्या नावाखाली कुंभवडे गावचा जगाशी असलेला संपर्कच तोडण्यात आला आहे. यामुळे कुंभवडेवासीयांना पावसाळ्याचे चार महिने कसे काढायचे असा प्रश्‍न पडला आहे. ग्रामस्थांच्या वाहतुकीची तात्पुरती व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

कुंभवडे हे चौकुळपासून साडेचार किलोमीटरवर असलेले गाव. सह्याद्रीच्या रांगामध्ये वसलेल्या कुंभवडेत नैसर्गिक संपन्नता खूप मोठ्या प्रमाणात आहे. मात्र डोंगररांगात असल्याने हे गाव आतापर्यंत दुर्गमतेचे दशावतार झेलत आले आहे. असे असले तरी येथे काही वर्षापूर्वी डांबरी रस्ता झाला. यामुळे चौकुळ, आंबोलीसह सावंतवाडीशी हे गाव बारमाही वाहतुकीने जोडले गेले. गावात वस्तीच्या गाडीसह रोज तीन एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्या. यामुळे गावाच्या विकासालाही चालना मिळाली. असे असले तरी प्रशासनाकडून मात्र कुंभवडेला कायमच सावत्र वागणूक मिळत गेली. या गावाला कायम ‘गृहीत’ धरून शासन धोरण ठरविले गेले. यामुळेच भौगोलिकदृष्ट्या आणि रस्ते मार्गाने सावंतवाडी जवळ असूनही हे गाव ७५ किलोमीटरवर मुख्यालय असलेल्या दोडामार्ग तालुक्‍याला जोडले गेले. गावची ग्रामपंचायत मात्र सावंतवाडीतले चौकूळ हे गाव आहे. यामुळे अनेक वर्षे प्रशासकीय कामासाठी या गावची ओढाताण सुरू होती. या सगळ्याची कडी म्हणजे या पावसाळ्यात रस्ते कामाच्या नावाखाली कुंभवडेचा जगाशी असलेला संपर्कच तोडण्यात आला आहे.

साधारण तीन वर्षांपूर्वी चौकुळहून कुंभवडेमार्गे तळकटला जाणारा रस्ता मंजूर झाला. त्याचे कामही सुरू झाले. यासाठी कुंभवडे ते तळकट हा १५ किलोमीटरचा मार्ग नव्याने केला जात आहे. या बरोबरच चौकुळ-केगदवाडी ते कुंभवडे हा जुना मार्ग तोडून नवा रुंद रस्ता बनविला जात आहे. या रस्त्याचे काम होण्यापूर्वी पावसाळ्यातील वाहतुकीची व्यवस्था करावी अशी अट कुंभवडेवासीयांनी सार्वजनिक बांधकाम व ठेकेदारासमोर ठेवली होती. ती मान्यही करण्यात आली. मात्र पूर्ण रस्ता खोदून ठेवला गेला. पावसाळा सुरू होताच हा रस्ता चिखलाने माखला आहे. यावरून वाहतूक बंद झाली आहे. एसटी सोडाच मोटारसायकल नेणेही बंद झाले आहे.  यामुळे एसटी सध्या केगदवाडीपर्यंत येत आहे. शाळकरी मुले, ग्रामस्थ यांना साडेचार किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. आजारी व्यक्ती असल्यास त्याला डॉक्‍टरपर्यंत कसे पोचवायचे हा प्रश्‍न ग्रामस्थांना पडला आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष सत्यप्रकाश गावडे म्हणाले, ‘‘त्यावेळी ठेकेदाराने वाहतूक व्यवस्था करण्याची ग्वाही दिली होती. आता मात्र कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. ग्रामस्थांना पावसाळा कसा काढायचा हा प्रश्‍न आहे. संबंधितांनी केगदवाडीपर्यंत जीप किंवा अन्य पर्याय उपलब्ध करून तातडीने वाहतूक व्यवस्था करावी, अन्यथा आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही.’’

रुग्णास जेसीबीतून आणण्याची वेळ
कुंभवडे हे सुमारे साडेचारशे लोकवस्तीचे गाव आहे. गावात एखादा व्यक्ती आजारी पडली तर त्याच्यावर उपचार कसे करायचे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत सत्यप्रकाश गावडे म्हणाले, ‘‘पाच-सहा दिवसांपूर्वी एका ग्रामस्थाला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्याला तातडीने रुग्णालयात नेणे आवश्‍यक होते. शेवटी जेसीबीमधून त्याला चौकुळपर्यंत आणावे लागले.’’