प्राचीन चिपळूण नगरीच्या ‘तटबंदी’चा शोध

चिपळूण - कोकणची निर्मिती करणाऱ्या श्री देव परशुरामाचे मंदिर.
चिपळूण - कोकणची निर्मिती करणाऱ्या श्री देव परशुरामाचे मंदिर.

समीर कोवळेंचे संशोधन - ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये उल्लेख

चिपळूण - परकीयांचे आक्रमण रोखण्यासाठी प्राचीन चिपळूण नगरीला तटबंदी होती. या तटबंदीचा इतिहास उलगडण्यासाठी निसर्ग व पर्यटन अभ्यासक समीर कोवळे यांचे संशोधन सुरू झाले आहे. कोकणातील महत्त्वाचे शहर असलेल्या चिपळूणच्या प्राचीन काळातील खुणा शोधण्याची मोहीम श्री. कोवळे यांनी सुरू केली आहे.

कोकणच्या विविधांगी विषयावर अभ्यास करणारे समीर कोवळे यांचा संशोधनानिमित्त पुणे येथील प्राचीन पुराण वस्तुसंग्रहालय, प्राच्य विद्या संग्रहालय व पुराण वस्तुसंग्रहालयाशी संपर्क आला. या संग्रहालयातील मोडी हस्तलिखित व सांकेतिक भाषेमध्ये काही ऐतिहासिक कागदपत्रे श्री. कोवळे यांना सापडली. कोवळे यांनी वर्षभर या कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यातून प्राचीन चिपळूण नगरीला तटबंदी होती. याचे पुरावे त्यांना मिळाले. काही इतिहासतज्ज्ञांची भेट घेऊन प्राचीन तटबंदीच्या विषयावर चर्चा केली. त्यांनीही तटबंदी असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिल्यानंतर श्री. कोवळे यांनी तटबंदीचे संशोधन सुरू केले आहे.

वर्षभर त्यांचा या विषयावर अभ्यास सुरू आहे. याबाबत ‘सकाळ’ला माहिती देताना श्री. कोवळे म्हणाले, विष्णूचा अवतार समजल्या गेलेल्या श्री देव परशुराम याने समुद्र हटवून कोकणभूमी तयार केली. त्याच परशुरामाचे प्राचीन मंदिर चिपळूण शहरापासून जवळच परशुराम गावी आहे. श्री. देव परशुरामाने श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला सायंकाळी चिपळूण नगरीची स्थापना केली. त्याचा उल्लेख इ. स. १६३७ मधील ग्रंथकर्ता कवी विश्‍वनाथ लिखित श्री व्याडेश्‍वर महात्म्य या प्राचीन संस्कृत ग्रंथात आढळतो. इतिहास काळात चिपळूण नगरावर पेशव्यांची राजवट होती, तर खाडीपट्टा व सागरी किनाऱ्यावर ॲबेसेनी या देशातील जंजिरेकर सिद्दी यांची सत्ता होती. कोकणच्या संपूर्ण खाडीकिनाऱ्यावर जंजिरेकर सिद्दी यांची राजवट होती. मुरूडचा जंजिरा किल्ला त्यांच्याच नावाने प्रसिद्ध आहे.

पेशव्यांची राजवट असलेल्या चिपळूणवर परकीय आक्रमण होऊ नये म्हणून तटबंदी घालण्यात आली होती. या तटबंदीच्या संशोधनाची सुरवात श्री. कोवळे यांनी वेस मारुती मंदिरापासून केली आहे. चिपळूण शहरात वेस मारुतीचे खूप जुने व प्राचीन मंदिर आहे. गावच्या सरहद्दीला वेस म्हणतात. या वेशीवर इतिहास काळापासून प्रताप किंवा वीर मारुतीची मूर्ती प्रतिष्ठापना केली गेली. वेशीवर वसलेला मारुती म्हणून त्याला वेस किंवा वेशीचा मारुती हेच नाव कालांतराने रूढ झाले. शहराची हद्द वेस मारुतीच्या मंदिरापासून सुरू झाली असेल, तर प्राचीन काळातील तटबंदीसुद्धा याच ठिकाणी असू शकते असा श्री. कोवळे यांचा अंदाज आहे. 
 

शहराची सद्यःस्थितीची रचना, प्राचीन जंगमपालीचे अवशेष, प्राचीन शिल्प, प्रार्थनास्थळे आदी डोळ्यासमोर ठेवून १७ व्या शतकातील पाऊल खुणा शोधण्याचे काम सुरू आहे. मराठी, मुस्लिम आणि पाेर्तुगीज यांच्या कलेचा संगम येथे आढळतो. आता शहर पूर्ण बदलेले आहे. त्यामुळे पूर्वीची रचना व तटबंदी शोधण्याचे काम आव्हानात्मक आहे. 
- समीर कोवळे, निसर्ग व पर्यटन अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com