मालवण तालुक्‍यातील विकासकामे मार्गी लावू - रेश्‍मा सावंत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

मालवण - पंचायत समिती स्तरावर तालुकावार आढावा बैठका घेत गावांमधील विविध समस्या जाणून घेत तेथील विकासात्मक कामे मार्गी लावली जाणार आहेत. या बैठकीस गावच्या सरपंचांची उपस्थिती आवश्‍यक आहे. तालुक्‍याची आढावा बैठक घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्‍मा सावंत यांनी आज येथे दिली. 

येथील पंचायत समितीस आज दुपारी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्‍मा सावंत यांनी भेट देत कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, सभापती मनीषा वराडकर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, उपसभापती अशोक बागवे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, कमलाकर गावडे उपस्थित होते.  

या वेळी सभापती वराडकर यांनी तालुक्‍याच्या शिक्षण विभागात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. यात पदवीधर ६०, उपशिक्षक २९ तसेच काही केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी अशी रिक्त पदे आहेत. ही पदे भरण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

तालुक्‍यातील ज्या गावांत सध्या पाणीटंचाई आहे त्याची माहितीही यावेळी त्यांनी सादर केली. टंचाई निवारणाची यंत्रणा असलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग मालवण, देवगड व ओरोस अशा तीन ठिकाणचा पदभार हा एकाच व्यक्तीकडे असल्याने त्यांच्यावरील ताण वाढला आहे. त्याचा कामावर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे ही रिक्त पदे भरण्याची कार्यवाही व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

टंचाई निवारणासाठी प्रयत्न
पंचायत समितीतील रिक्त पदांबरोबरच गावांमधील पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना राबविल्या जातील, असे श्रीमती सावंत यांनी यावेळी सांगितले.