दाभोळ : बाणकोटच्या हिम्मतगडावर सह्याद्री प्रतिष्ठानने राबवलेल्या स्वच्छता मोहिमेत मोठा तोफगोळा आणि लोखंडी कडी मिळाली आहे. हे साहित्य बाणकोट ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आले आहे, अशी माहिती श्रीवर्धन विभाग अध्यक्ष योगेश निकाते, ललितवेश दवटे, राहुल खांबे, प्रतीक्षा सापटे यांनी दिली.
दरम्यान, या वस्तू आता ग्रामपंचायतीत ठेवण्यात आल्या आहेत. पुरातत्व विभाग अधिकारी बाणकोट किल्ल्याला भेट द्यायला येतील, तेव्हा तोफगोळा व कडी ताब्यात घेणार असल्याचे योगेश निकाते यांनी सांगितले. या स्वच्छता मोहिमेत श्रीवर्धन, दापोली आणि मंडणगड येथील संस्थेचे सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ सहभागी होते.
बाणकोट किल्ल्यावर २०२० मध्ये संस्थेमार्फत लोकवर्गणीतून सागवानी तोफगाडा बसविण्यात आला असून येत्या काही दिवसांतच सागवानी प्रवेशद्वारही बसविण्यात येणार आहे. राज्य पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालकाच्या मार्गदर्शनाखाली हे काम केले जात आहे. आजवर संस्थेमार्फत १८०० हून अधिक दुर्ग संवर्धन मोहिमा झाल्या असून २००० किल्ल्यांची दुर्गदर्शन मोहिमा झाल्या आहेत. लोकवर्गणीतून प्रतापगड आणि वसंतगड तटबंदी बुरुज बांधकाम, १३ प्रवेशद्वार व ४० तोफांना तोफगाडे बसविण्यात आल्याचे निकाते यांनी सांगितले.
तोफगोळा लांबी-रुंदी २ इंच व १० इंच व्यास
सह्याद्री प्रतिष्ठानने हिम्मतगडावर स्वच्छता मोहिम राबवली. सुका व ओला कचरा, बाहेरील बाजूची झाडेझुडपे काढण्यात आली. साफसफाई करताना किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील देवडीमध्ये २ इंच लांबी-रुंदी व १० इंच व्यास असलेला लोखंडी तोफगोळा आणि लोखंडी दरवाजाच्या गंज लागलेल्या कड्या सापडल्या. प्रतिष्ठानने या वस्तू बाणकोट ग्रामपंचायतीचे सरपंच हमीदा परकार यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.