दापोलीशी बाबासाहेबांचे भावनिक नाते

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

दापोली - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव मंडणगड तालुक्‍यातील आंबडवे असले, तरी दापोली शहराशी त्यांचे भावनिक नाते होते. आजही दापोलीकरांचे त्यांच्याशी आदराचे नाते आहे. त्यांचे शहरातील वास्तव्य दापोलीकरांसाठी अभिमानाचा बिंदू आहे. काळकाई कोंड येथे त्यांचे बालपण गेले.

बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ ला मध्य प्रदेश राज्यातील महू येथे झाला. वडील सुभेदार रामजी सकपाळ महू येथे लष्करी सेवेत कार्यरत होते. १८९३ ला लष्करातील सेवेतून निवृत्त झाल्यानंतर कुटुंबासह दापोली येथे वास्तव्यास आले. या कुटुंबाचे १८९६ पर्यंत काळकाई कोंड येथील कौलारू घरात वास्तव्य होते. याठिकाणी सध्या त्रैलोक्‍य बौद्ध महासंघाचे वसतिगृह आणि ध्यान केंद्र आहे. भीमराव वयाने लहान असल्यामुळे ‘कॅम्प दापोली’ येथील शाळेत त्यास प्रवेश मिळाला नाही. यामुळे घरीच भीमरावास अक्षरओळख करावी लागली. १८९६ ला सुभेदार रामजी आपल्या परिवारासह दापोली येथून सातारा येथे राहण्यास गेले. या वेळी भीमराव पाच वर्षांचे झाले होते.

डॉ. बाबासाहेब यांचा यानंतर दापोलीशी पुन्हा संबंध १९०७ ला त्यांच्या विवाहाच्या निमित्ताने आला. दापोलीपासून अवघ्या पाच कि.मी. अंतरावर असलेल्या वणंद येथील भिकू आणि रुक्‍मिणी धोत्रे यांची कन्या रमा हिच्याशी भीमरावचा विवाह झाला. आई-वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर रमाई आणि त्यांच्या भावंडांना त्यांचे मामा मुंबईत घेऊन आले. रमाई आणि त्यांची दोन भावंडे भायखळा येथे मामांकडे वास्तव्यास होती. वयाच्या नवव्या वर्षी रमाबाईचे लग्न बाबासाहेबांशी मुंबईत झाले. रमाईंचे माहेर जरी वणंद हे गाव असले तरी लग्नानंतर डॉ. बाबासाहेब आणि रमाईनी वणंदला भेट दिल्याची नोंद आढळत नाही; मात्र त्यांचे येथील वास्तव्य दापोलीकरांना अभिमानाची बाब आहे.

Web Title: babasaheb relation with dapoli